कायगाव : गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात विसर्जनासाठी आलेला गणेशभक्त तोल जाऊन पडला. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून जीवन रक्षक पथकातील स्वयंसेवकांनी त्या युवकास सुखरूप बाहेर काढले. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा खंडोबा येथील अष्टविनायक गणेश मंडळाचे सदस्य गुरुवारी रात्री जुने कायगाव येथे गणेश विसर्जनासाठी आले होते. त्यात रात्री बारा वाजेच्या सुमारास विसर्जन सुरू असताना मंडळाचा सदस्य अदिल शेख याचा सेल्फी घेण्याच्या नादात पुलावरून अचानक तोल गेला. त्यामुळे तो सरळ नदी पात्रातील मुख्य धारेत पडला. जवळपासच्या सगळ्या गणेशभक्तांनी आरडाओरड सुरू केली.
पोलिस निरीक्षक मुकुंद आघाव यांनी तात्काळ पात्रातील तैनात असलेल्या जीवनरक्षक दलाच्या सदस्यांना ध्वनिक्षेपक आणि मोबाईल वरून याबाबत सूचना केल्या. माहिती मिळताच रामेश्वर मंदिराच्या घाटानजीकच्या बोट मधील तैनात असणाऱ्या जीवरक्षक पथकाचे सदस्य दशरथ बिरुटे, महेश खिरे, अक्षय बिरुटे, अमोल बिरुटे, गणेश अहिरे व तहसिलचे कर्मचारी विजय वाढे यांना सोबत घेऊन गंगापूर नगरपालिकेची बोट तात्काळ घटनास्थळी पोहोचली. बोटीतील जीवनरक्षक पथकाच्या सदस्यांनी पात्रात उड्या मारून त्या युवकास वाचवले. त्यास सुखरूप बोटीत बसवून आरोग्य विभागाच्या हजर असणाऱ्या पथकाच्या ताब्यात देऊन त्याची तपासणी करण्यात आली.
युवक पाण्यात पडल्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्या युवकास पाण्याबाहेर काढण्यात आल्याने त्याचे प्राण वाचले. पोलिसांची समयसूचकता आणि स्थानिक युवकांचे कौशल्य याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस प्रशासन आणि जीवनरक्षक पथकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याने सर्वानी सुटकेचा निःश्वास सोडला.