छत्रपती संभाजीनगर : ऐन उड्डाणाच्या वेळी इंडिगोच्या सायंकाळच्या मुंबई- छत्रपती संभाजीनगर विमानात बिघाड झाल्याची घटना सोमवारी मुंबई विमानतळावर घडली. या घटनेनंतर मुंबईहून शहरात येणाऱ्या आणि शहरातून मुंबईला जाणाऱ्या विमान प्रवाशांचा खोळंबा झाला.
इंडिगोचे सायंकाळचे मुंबई-छत्रपती संभाजीनगर हे विमान दररोज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास येते आणि सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास मुंबईसाठी उड्डाण घेते. मुंबईहून हे विमान सोमवारी उड्डाणासाठी धावपट्टीकडे आले. तेव्हाच विमानात तांत्रिक बिघाड झाला. बऱ्याच वेळ प्रवासी विमानातच होते. अखेर सर्व प्रवाशांना विमानातून उतरविण्यात आले आणि पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रवासी मुंबई विमानतळावरच होते, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला जाणारे प्रवासी चिकलठाणा विमानतळावर ताटकळले होते. अनेक प्रवाशांनी प्रवासाचे नियोजनच रद्द केले. मुंबईहून येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, तर इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
पार्किंग ब्रेक जाम, सुदैवचमुंबई-छत्रपती संभाजीनगर विमानाचे प्रवासी रवींद्र वैद्य म्हणाले, विमान उड्डाणासाठी धावपट्टीवर आले. त्याच वेळी पार्किंग ब्रेक जाम झाले. तशी माहिती प्रवाशांना देण्यात आली. उड्डाणानंतर हा प्रकार झाला असता तर धोका नाकारता येत नव्हता. विमानाचे टायरही घासलेले होते. विमानाच्या मेंटेनन्सकडे दुर्लक्ष होत आहे, अशा प्रश्न पडत आहे. या घटनेनंतर आम्हाला विमानातून उतरविण्यात आले. अन्य विमानाची व्यवस्था केली जात असल्याचे सांगण्यात आले.