लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्टÑातील अठरा पगड जातींची भगवानगडावर मागील अनेक वर्षांपासूनची श्रद्धा आहे. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील तमाम भाविक वैचारिक सोने लुटण्यासाठी याठिकाणी येतात. मागील काही वर्षांपासून भगवानगडाचे प्रमुख नामदेव शास्त्री दसरा मेळाव्यास विरोध करीत आहेत. कोणतेच कारण नसताना पंकजा मुंडे यांना विरोध करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत यंदा दसरा मेळावा भगवानगडावरच होणार, असा दावा कृती समिती व वंजारी सेवा संघाने शनिवारी पत्रकार परिषदेत केला.यावेळी प्रा. डॉ. खुशाल मुंढे यांनी सांगितले की, भगवानगड हे आमच्यासाठी श्रद्धेचे ठिकाण आहे. आयुष्यभर कष्ट करून स्व. गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडाचा विकास केला. भीमसिंग महाराजानंतर भगवानगडाचे उत्तराधिकारी म्हणून नामदेव शास्त्री यांची शिफारसही गोपीनाथ मुंडे यांनीच केली होती. अनेक भाषणांमध्ये शास्त्री यांनी हे जाहीरपणे मांडले आहे. गोपीनाथ मुंडे हयात असेपर्यंत शास्त्री यांनी कोणत्याच गोष्टीला नकार दिला नाही. आज पंकजा मुंडे यांना भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यास विरोध दर्शविण्यात येत आहे. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये शास्त्री यांनी आपली भूमिका कशी सोयीनुसार बदलली याचे पुरावेच कृती समितीने सादर केले.भगवानगडावर दसरा मेळाव्यात कोणतेही राजकीय भाषण यापूर्वी झालेले नाही, यापुढेही होणार नाही. समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी हा मेळावा होत आहे. मेळाव्याच्या परवानगीसाठी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना पत्र पाठविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.