औरंगाबाद : महापालिकेची विसकटलेली आर्थिक घडी सुधारली आहे. एप्रिल २०२२ मध्ये महापालिका कर्जमुक्त होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात विकासकामांना पंख देण्याचे काम प्रशासन करणार आहे.
३१७ कोटींमध्ये मुख्य रस्ते गुळगुळीत करण्यात येतील. ३० इलेक्ट्रिक बसेसची खरेदी करणार असून, हर्सूल कचरा प्रक्रिया प्रकल्प सहा महिन्यांत पूर्ण करायचा आहे. ७ कोटी रुपये खर्च करून महापालिकेच्या शाळा स्मार्ट केल्या जातील. ३० कोटी रुपयांत स्मार्ट रुग्णालयांची उभारणी केली जाणार असून, गुळगुळीत रस्त्यांवर आकर्षक दुभाजक, फुटपाथ आणि सफारी पार्कच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होईल. शिवाय, संत एकनाथ रंगमंदिराचा पडदा उघडण्यात येणार असल्याची घोषणा शुक्रवारी एका भरगच्च पत्रकार परिषदेत प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी केली.
३१७ कोटींचे रस्तेशहरातील मुख्य रस्ते खराब आहेत. हे रस्ते गुळगुळीत करण्यासाठी महापालिकेने नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. नवीन वर्षात हा प्रस्ताव मंजूर होईल आणि कामेही होणार आहेत. या प्रकल्पामुळे शहर खड्डेमुक्त होणार हे निश्चित.
हर्सूल प्रक्रिया प्रकल्पचिकलठाणा-पडेगाव येथे सध्या ३०० मे. टन कचऱ्यावर रोज प्रक्रिया सुरू आहे. हर्सूल येथील प्रकल्प सहा महिन्यांत कार्यान्वित होईल. त्याचप्रमाणे चिकलठाणा-पडेगाव येथील जुन्या कचऱ्यावर नवीन वर्षात शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होणार आहे. कचरा जमा करण्यासाठी शहरात काही ठिकाणी ट्रान्स्फर स्टेशनही उभारले जातील.
३० इलेक्ट्रिक बस घेणारशहर बसच्या ताफ्यात ३० इलेक्ट्रिक बस येतील. ५ बस पर्यटनमार्गावर धावतील, २० बस मार्चपर्यंत येतील. तसेच ५ इलेक्ट्रिक कार २६ जानेवारीपर्यंत खरेदी केल्या जाणार आहेत. जाधववाडी येथे स्वतंत्र बस डेपो उभारण्यात येणार आहे.
डस्ट फ्री सिटीशहर धूळमुक्त व्हावे म्हणून महापालिकेने यापूर्वीच रस्ते स्वच्छ करण्यासाठी स्विपिंग मशीन घेतल्या आहेत. बांधकाम साहित्य गोळा करण्यासाठी एक स्वतंत्र पथकच नवीन वर्षापासून काम करील. जमा केलेले डेब्रिज वेस्ट खाम नदीकाठी वापरले जाणार आहे.
२४ दुभाजक, ०३ फूटपाथ१५व्या वित्त आयोगाच्या निधीतून २४ रस्त्यांवर दुभाजक, ३ रस्त्यांवर फूटपाथ तयार करण्यात येतील. या कामामुळे शहर सौंदर्यीकरणात भर पडणार आहे.
सफारी पार्कचा दुसरा टप्पासफारी पार्कच्या पहिल्या टप्प्यात संरक्षण भिंत बांधण्यात आली. दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.
०७ कोटींच्या स्मार्ट शाळासाडेतीन दशकांत पालिकेतील कारभाऱ्यांनी शाळांकडे कधीच लक्ष दिले नाही. दिल्ली सरकारने ज्या पद्धतीने शाळा तयार केल्या, त्या धर्तीवर ७ कोटी रुपयांतून महापालिकेच्या शाळांचे रुपडे पालटले जाणार आहे.
३० कोटींची अत्याधुनिक रुग्णालयेशहरात महापालिकेची ५ रुग्णालये, ३९ आरोग्य केंद्रे नावालाच सुरू आहेत. रुग्णांना दर्जेदार सोयी-सुविधा तेथे देता येत नाहीत. घाटीवरील ताण कमी करण्यासाठी ३० कोटी रुपये खर्चून सर्व रुग्णालये, आरोग्य केंद्रे अद्ययावत केली जातील.
स्मार्ट सिग्नलशहरातील सिग्नलची अवस्था अत्यंत वाईट आहे. शहरात २५ अत्याधुनिक सिग्नल उभारले जातील व इतर सर्व सिग्नल दुरुस्त केले जातील.
ऑनलाईन सुविधानागरिकांना मालमत्ता कर, पाणीपट्टी ऑनलाईन भरता येईल. नागरी सुविधांसाठी ॲप तयार केले जात आहे. महापालिका विविध परवानग्या ऑनलाईन देईल. आरटीआय कार्यकर्तेही ऑनलाईन महिती घेऊ शकतील.
क्रांती चौकात शिवाजी महाराजांचा पुतळाक्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नवीन वर्षात बसविला जाईल. या परिसरात संतसृष्टीच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. ३० मावळे तयार करण्यात येत आहेत. ९ कोटी रुपये खर्च करून शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय अद्ययावत केले जाईल.
संत एकनाथ रंगमंदिरसंत एकनाथ रंगमंदिराचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. नवीन वर्षात संत एकनाथ रंगमंदिराचा पडदा उडण्यात येणार असून, लवकरच सिडको नाट्यगृहाचेही काम पूर्ण होईल.
अत्याधुनिक कत्तलखानापडेगावात अत्याधुनिक कत्तलखाना उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, दोन ते तीन महिन्यांत हा प्रकल्पही पूर्ण होणार आहे.