पैशाच्या नादी लागू नका आता, आपला माणूस हक्काचा, इतिहास वाचायला नाही तर रचायला येतोय, अशा हटके घोषणांचा वापर करून उमेदवार आपला प्रचार करीत आहेत.
सोशल मीडियावर कधी न चमकणारे सध्या प्रचाराच्या माध्यमातून झळकत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवार त्या अनुषंगाने वॉर्ड बैठका, गावबैठका, घरोघरी व चौकाचौकांत रणनीती ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबर बैठका घेत आहेत. यंदा प्रचारफेरी नाही, तर सोशल मीडियावर जास्त जोर दिला जात आहे. अनेक व्हिडीओ, ऑडिओ एडीट करून व्हायरल केले जात आहेत.
'आता नाही, तर पुन्हा नाही', 'एकटा टायगर', 'आमचं ठरलंय', 'फिफ्टी फिफ्टी' अशा विशेषणांनी सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा उडत आहे.
फेसबुक आणि व्हॉट्सॲपद्वारे उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. असा स्वस्तात मस्त घरबसल्या प्रचार होत असून, त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे.
----
बंधनांमुळे रंगली चर्चा
कोरोनामुळे निवडणूक प्रचारावर बऱ्याच मर्यादा आल्या आहेत. तसेच प्रशासनानेही प्रचार पद्धतीवर अनेक निर्बंध घातले आहेत.
पूर्वी असंख्य कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन उमेदवार प्रचार करत होते, पण आता ठरावीक कार्यकर्त्यांना घेऊनच उमेदवाराने प्रचार करावा, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, असे नियम घातले आहेत. त्यामुळे उमेदवारांचीही गोची झाली आहे. त्यामुळेच उमेदवारांचा सोशल मीडियावरून प्रचार वाढला आहे.
स्थानिक पुढाऱ्यांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली होती. राज्य सरकारने गावपुढाऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवले. सरपंचपदाचे आरक्षण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने सरपंच कोण होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.