बीड / केज : डोणगाव (ता. केज) येथे क्षुल्लक कारणावरून एका तरुणीला मारहाण झाली होती. या प्रकरणातील आरोपींवर अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा नोंद झाला. परंतु पोलिसांनी जुजबी कारवाई केली. त्यामुळे तरूणी दहशतीखाली असून, तिची न्यायासाठी परवड सुरू आहे.डोणगाव येथील संध्या भगत या तरूणीला १ जुलै रोजी शेतात कोंबड्या आल्याच्या कारणावरून आण्णा नवनाथ भुसारे, नवनाथ चंद्रसेन भुसारे, चंद्रसेन गजेबा भुसारे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. तरूणीच्या फिर्यादीवरून केज ठाण्यात मारहाण, अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद झाला.दरम्यान, संध्याला धमकावण्याचे प्रकारही घडले. त्यामुळे तिने नुकतेच केज तहसीलसमोर तीन दिवस उपोषण करून कारवाईची मागणी केली. पोलिसांनी मात्र, ठोस कारवाई न करता प्रतिबंधात्मक कारवाई करून आरोपींना सोडून दिले. तिच्या मारहाणीच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची पोलीस प्रतीक्षा करीत आहेत.आरोपींना अटक करून नंतर त्यांची चौकशी करावी, अशी संध्याची मागणी आहे. त्यासाठी ती पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय व केज ठाण्याचे उंबरठे झिजवत आहे. (प्रतिनिधी)
डोणगावच्या तरुणीची न्यायासाठी परवड
By admin | Published: August 19, 2016 12:32 AM