पिशोर : उन्हाच्या त्राहीपासून बचाव करण्यासाठी मित्रांसोबत शेततळ्यावर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या एका ३५ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाकीनजीकच्या रोजेपूर शिवारात रविवारी दुपारी ३.३० वाजेदरम्यान उघडकीस आली. याबाबत पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत सपोनि. जगदीश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकीनजीक असलेल्या रोजेपूर शिवारात विठ्ठल जंजाळ यांच्या शेतात एक भले मोठे शेततळे आहे. वाकी येथील गणेश ऊर्फ भगवान विनायक मुरमुडे (३५) हा युवक आपल्या दोन मित्रांसोबत गावातील एक कार्यक्रम आटोपून शीण घालवण्यासाठी म्हणून दुपारी रोजेपूर शिवारातील या शेततळ्यावर आंघोळीसाठी गेला होता. तिघे मित्र शेततळ्याच्या काठावर बसून आंघोळ करीत असताना गणेशचा पाय घसरला व तो तळ्याच्या पाण्यात पडला. सोबतच्या दोन मित्रांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना जमा केले. मात्र गणेश तोपर्यंत पाण्यात बुडाला होता. या घटनेची माहिती पोलीस पाटील सासमकर यांनी पिशोर पोलिसांना दिली. जमादार गाडेकर व वाघ यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील पोहणाऱ्या तरुणांना मदतीसाठी बोलावले. शेततळे खूप खोल व मोठे असल्याने शोध घेण्यास अडचण निर्माण होत होती. शेवटी चार तासांच्या अथक परिश्रमानंतर गणेशचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने सायंकाळी सात वाजेदरम्यान गणेश ऊर्फ भगवान विनायक मुरमुडे याचा मृतदेह चिंचोली लिंबाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. सोमवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे सपोनि. पवार यांनी सांगितले. पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शेततळ्यात बुडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 12:19 AM