सिल्लोड : अन्न-पाण्याच्या शोधार्थ डोंगरात भटकंती करणाऱ्या दीड वर्षाच्या बिबट्याचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. सिल्लोड तालुक्यातील शिरसाळा डोंगरात तब्बल पाच दिवसांपासून बिबट्याचा मृतदेह पडून होता. एका गुराख्याने वन विभागास माहिती दिल्याने ही गंभीर घटना समोर आली. शुक्रवारी जागेवरच शवविच्छेदन करून बिबट्यावर वन विभागाने अंत्यसंस्कार केले.शिरसाळा गावापासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या खोल दरीत गुरुवारी सायंकाळी बिबट्याचा मृतदेह पडलेला एका गुराख्याला दिसला. त्याने गुरुवारीच सोयगाव वन विभागास माहिती दिली, पण तेथील काही कर्मचारी जळगाव, तर काही औरंगाबाद येथे राहत असल्याने याची माहिती गुरुवारी लपविण्यात आली.सिल्लोडचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.आर. दहीवाल, अजिंठ्याचे मागधरे, सोयगावचे शिवाजी काळे, वनपाल, वनरक्षक आदींनी शुक्रवारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.सोयगावचा वनविभाग निष्काळजीशिरसाळा हे गाव सिल्लोड तालुक्यात येत असले तरी वन विभागाची हद्द सोयगाव आहे. सर्व गैरसोयींनी ‘नटलेल्या’ सोयगावातील अधिकारी, कर्मचारी औरंगाबाद, जळगाव येथून अपडाऊन करतात. जंगलात वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी नाही, सर्व पाणवठे कोरडे पडले आहेत. कागदावरील पाणवठ्यात पाणी सोडले जाते. डोंगरात वृक्षतोड वाढली आहे. ५ दिवसांपूर्वी डोंगरात मरून पडलेला बिबट्या वन कर्मचाºयांना कसा दिसला नाही, याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. यावरून सोयगावचा वन विभाग किती निष्काळजी आहे, हे दिसून येते.ंअन्नपाणी न मिळाल्यानेच बिबट्या गतप्राणपाच-सहा दिवस झाल्याने बिबट्याचा मृतदेह कुजला होता. त्याची चामडी गळून पडत होती. पोटात अन्न व पाणी नव्हते. त्यामुळे हा भूकबळीचाच प्रकार आहे, अशी माहिती शवविच्छेदन करणारे घाटनांद्रा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय महाजन यांनी दिली.
अन्न-पाण्याविना बिबट्याचा तडफडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 1:02 AM