वाळूज महानगर : नवीन वीज जोडण्या देण्यासाठी महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळाने वेगवान व तत्पर कार्यवाही करीत २०२३ मध्ये सर्व वर्गवारींमध्ये ५६ हजार ६९७ नवीन वीज जोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. तसेच, नवीन वीज जोडण्या देण्यासाठी गतवर्षी लागणारा सरासरी दीड महिन्याचा कालावधीही केवळ एका आठवड्यावर आणण्यात महावितरणला यश आले आहे.
परिमंडळामध्ये दरवर्षी ४० ते ५० हजार नवीन वीज जोडण्या देण्यात येतात. मात्र, यंदा वीज जोडण्या देण्यास नियोजनपूर्वक वेग देण्यात आला आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने ‘इझ ऑफ लिव्हिंग’ संकल्पना आणली आहे. यात वीजपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यानुसार ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीज पुरवठ्यासह सर्व सेवा तत्परतेने देण्याचे आदेश आहेत. यात नवीन वीज जोडणी तत्परतेने देण्यासह खंडित वीजपुरवठा, बिलिंग व ग्राहकांच्या इतर तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यात राज्यात आघाडी घेतली आहे.
२०२३ मध्ये घरगुती-४१४१४, वाणिज्य- ५८८२, औद्योगिक- १६१७ आणि कृषी व इतर ७७८४ अशा एकूण ५६ हजार ६९७ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहर मंडळात १५८३१, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडळात २५९२७, तर जालना मंडळात १४९३९ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या.
सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचारी कटिबद्ध२०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर परिमंडळात जवळपास ५७ हजार नवीन जोडण्या देण्यात आल्या. हा वेग आणखी वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, नियामक आयोगाच्या कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीत वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी परिमंडळातील सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचारी कटिबद्ध आहेत.- डॉ. मुरहरी केळे, मुख्य अभियंता, महावितरण