हिंगोली : जिल्ह्यातील महसूल, भूमिअभिलेख आणि नगररचना विभागाच्या जवळपास १७ लाख दस्तांची ई-स्कॅनिंग करण्यात येणार आहे. कळमनुरी तालुक्यातून या पथदर्शी प्रकल्पाला प्रारंभ होणार आहे.याबाबत माहिती देताना निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी म्हणाले, या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या सातबारा, नमुना आठ, क, ड, जमाबंदी यासह जमाबंदी व इतर महत्त्वाच्या संचिकांचे स्कॅनिंग होणार आहे. या दस्तांची स्कॅनिंग करताना त्यासाठी विशिष्ट प्रकारची कोडिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे ही माहिती विभागनिहाय वेगवेगळी साठविली जाईल. एकदा एक दस्त स्कॅनिंगद्वारे फिड केल्यानंतर पुन्हा तोच दस्त स्कॅनिंगला घेतलाच जाणार नाही, अशाप्रकारचे हे सॉफ्टवेअर आहे. त्याचबरोबर दस्त शोधण्यासाठीही या कोडिंगची मदत होणार आहे. ठराविक कोडिंगमुळे तो कमी वेळेत शोधण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर शोधण्यापासून ते प्रिंट काढण्यापर्यंतची प्रक्रिया सुलभ असून शुल्क भरल्याशिवाय दस्त मिळणार नाही, अशी व्यवस्था त्यात आहे. महसूल विभागाचे अनेक दस्त आता जिर्ण होत आहेत. त्यामुळे ते सांभाळणे अवघड झाले आहे. या प्रक्रियेमुळे स्कॅन केलेल्या दस्तांची हार्ड डिस्क संबंधित विभागाला उपलब्ध होणार आहे. शिवाय तलाठ्यापासून ते सर्वांना त्या-त्या फॉर्म्याटमध्ये डिस्क मिळणार आहेत. भूमिअभिलेख व नगररचना विभागाच्या दस्तांचीही याचप्रकारे स्कॅनिंग होणार आहे. एका खाजगी एजन्सीला हे काम दिले असून खास सॉफ्टवेअर वापरून हे काम होणार आहे. स्कॅन केलेल्या दस्तात कोणताही बदल करता येणार नाही.(वार्ताहर)
१७ लाख दस्तांचे ई-स्कॅनिंग
By admin | Published: September 09, 2014 11:53 PM