औरंगाबाद : चिकलठाण्यासाठी मंजूर झालेली पीटलाइन कोणत्याही परिस्थितीत जालन्याला जाऊ देणार नाही, असा पवित्रा चिकलठाणा येथील शेतकरी आणि गावकऱ्यांनी घेतला आहे. वेळ पडली तर पीटलाइनसाठी रस्त्यावरही उतरू, असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे पीटलाइनचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रेल्वेची पीटलाइन चिकलठाणा येथेच झाली पाहिजे, यासाठी चिकलठाणा संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेतकरी एकवटले आहेत. शेतकऱ्यांनी बुधवारी छोटेखानी बैठक घेत पीटलाइन चिकलठाणा येथून जाऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे. औरंगाबाद ही पर्यटनाची राजधानी असून, औद्योगिक वसाहती, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शिवाय भौगोलिकदृष्ट्या पीटलाइन चिकलठाणा येथेच झाली पाहिजे, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. हा लढा व्यापक करण्यासाठी शनिवारी सकाळी १० वाजता चिकलठाणा रेल्वेस्टेशन येथे बैठक आयोजित केली आहे.औरंगाबादेत पीटलाइन झाली पाहिजे, अशी मागणी गेल्या १५ ते २० वर्षांपासून करण्यात येत आहे. यासाठी चिकलठाणा येथे सर्वेक्षण करण्यात आले होते. पीटलाइनला मंजुरी मिळालेली होती, असे असताना अचानक पीटलाइन जालना येथे होणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. शनिवारी होणाऱ्या बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी रमेश दहीहंडे, अमोल कोरडे, विकिराजे पाटील, रामेश्वर कोरडे, विलास गायके, प्रकाश गायके, सचिन जैस्वाल, नीलेश कावडे, बाळू दहीहंडे, श्रीराम दहीहंडे यांची उपस्थिती होती.
यापूर्वी रेल्वे नेली, आता..यापूर्वी औरंगाबादहून सुटणारी आणि औरंगाबादकरांच्या सोयीची जनशताब्दी एक्स्प्रेस जालना येथे नेण्यात आली. आता पुन्हा मंजूर झालेली पीटलाइन पळविण्यात येत आहे. त्यामुळे या विरोधात चिकलठाणा आणि परिसरातील शेतकरी एकवटले आहेत. पीटलाइन जालन्याला जाऊ देणार नाही, असे रमेश दहीहंडे यांनी सांगितले.