छत्रपती संभाजीनगर : मधुमक्षिका पालन करून मध व्यवसाय करण्यासाठी जिल्हा खादी ग्रामोद्योग विभागांतर्गत असलेल्या मध संचालनालयाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करण्यात येते. यासोबतच या व्यवसायाचे तांत्रिक प्रशिक्षणही देण्यात येते. तीन वर्षांपूर्वी या व्यवसायाकडे वळलेल्या छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एका तरुणाने मधुमक्षिका पालनासोबतच मधुमक्षिका पेट्या भाड्याने देऊन दरमहा लाखो रुपयांची कमाई सुरू केली.
शासनाच्या खादी ग्रामोद्योग मंडळाची मध केंद्र योजना आहे. या योजनेंतर्गत मधुमक्षिका पालन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना दहा दिवस प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर ५० टक्के अनुदानावर १० मधपेट्या देण्यात येतात तर प्रगतशील मधपाळ असलेल्या व्यक्तींना २० दिवसांचे प्रशिक्षण आणि ५० पेट्या दिल्या जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे कमीत कमी एक एकर शेती असावी. अथवा तो जमीन भाडेतत्त्वावर घेऊनही हा व्यवसाय करू शकतो. बदलत्या हवामानाचा मधुमक्षिकांवर परिणाम होत असतो. त्यामुळे मधुमक्षिकांचा सांभाळ कसा करावा, मध कसा काढावा, याबाबतचे मार्गदर्शन मध संचालनालयाकडून देण्यात येते असे असले तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे हवामान मधुमक्षिका पालन व्यवसायासाठी पूरक नाही. असे असताना छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील टाकळी माळी येथील गणेश बुरकुले या तरूण शेतकऱ्याने मधुमक्षिका पेट्या भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला.
मोसंबी, आंबा बाग, डाळींब बाग, सूर्यफूल शेती अथवा अन्य कोणत्याही फळबागांचे यशस्वी पराग सिंचन न झाल्यास या बागांना फळ लागवड होत नाही. या बागांमध्ये मधुमक्षिका पेट्या नेऊन ठेवल्यास मधुमक्षिकांमुळे पराग सिंचन चांगल्या प्रकारे होते. याचा अनुभव शेतकऱ्यांना आल्याने गणेश बुरकुल यांच्याकडून शेतकरी मधुमक्षिका पेट्या भाड्याने नेतात. याविषयी बुरकूल यांनी लोकमत प्रतिनिधीला सांगितले की, आमच्या मधुमक्षिकापेट्या महाराष्ट्रातच नव्हे तर परराज्यांतही भाड्याने जातात.
जिल्ह्यात ६० जण करतात व्यवसायजिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधकेंद्र योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत मध केंद्राचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना मोफत प्रशिक्षण आणि अनुदानावर मधुमक्षिका पेट्या देण्यात येतात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६० जणांनी मधुमक्षिका पालन व्यवसायाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. यातील दोनजण प्रगतशील मधुमक्षिका केंद्रचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यातून ते लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.- आर.एस.आचार्य, व्यवस्थापक, जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ