छत्रपती संभाजीनगर : फावल्या वेळेत युट्यब चॅनेलला 'लाईक' करुन पैसे कमावण्याच्या जाहिरातीची सुशिक्षित तरुणाला लिंक आली. परंतू सायबर गुन्हेगारांनी पहिले त्याला १५० रुपये देऊन नंतर त्याच्याकडून २ लाख ७२ हजार रुपये उकळून फसवले. याप्रकरणी बेगमपुरा पाेलिस ठाण्यात संबंधित मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
३३ वर्षीय पंकज भालेराव (रा. हर्सुल) हे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये एका खासगी कंपनीत अकाऊंट असिस्टन्सट आहे. काही दिवसांपुर्वी त्यांना अनोळखी व्हॉट्स ऍप क्रमांकावरुन मेसेज प्राप्त झाला. 'फावल्या वेळेत यु ट्युब चॅनेलला लाईक करुन पैसे कमवा' असा मेसेज प्राप्त झाला. त्यात एका वेबसाईटची लिंक होती. भालेराव यांनी लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना पहिले सर्व माहिती देण्यात आली. विश्वस बसल्याने ते पुढिल प्रक्रियेत सहभागी झाले.
१५० रुपये आले अन् विश्वास बसलासायबर गुन्हेगारांनी ते प्रक्रियेत सहभागी होताच १५० रुपये पाठवले. त्यानंतर पुढिल टास्क पेड असून १ हजार भरल्यास १२०० रुपये मिळतील, असे सांगितले. त्यानुसार भालेराव यांनी अनुक्रमे १ व ३ हजार रुपये पाठवले. या दरम्यान, सायबर गुन्हेगार वेळोवळी त्यांना कॉल करुन विश्वास बसेल असे संभाषण साधत होते. परंतू पैसे मात्र दिले नाही. आपली फसवणूक होतेय, हे कळेपर्यंत सायबर गुन्हेगारांना सात टप्प्यांत २ लाख ७२ हजार १०० रुपये ट्रान्सफर मिळाले होते. सायबर पोलिसांनी यात तपास केला. मात्र, काही ठोस निष्पन्न होऊ शकले नाही. त्यानंतर बेगमपुरा पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज वर्ग करण्यात आला. पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे अधिक तपास करत आहेत.