औरंगाबाद : शहराच्या राजकारणात अल्पावधीत मोठे यश मिळविलेल्या मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीस विरोध करणारे नगरसेवक सय्यद मतीन सर्वप्रथम पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. महापालिकेच्या सभेत त्यांच्यावर भाजप नगरसेवकांकडून हल्ला झाल्यावर पक्षाचा एकही नगरसेवक त्यांना वाचविण्यासाठी पुढे आला नाही. नंतर मतीन यांची ही वैयक्तिक भूमिका होती म्हणून पक्षानेही हात झटकले. मतीन यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे पक्ष सोडण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
नगरसेवकांची घुसमटएप्रिल २०१५ पासून आतापर्यंत तीन विरोधी पक्षनेत्यांची निवड करण्यात आली. प्रत्येक वेळी मुस्लिम नगरसेवकालाच संधी देण्यात आली. दलित नगरसेवकांना निव्वळ आश्वासने मिळाली. शेवटच्या वर्षी चारपैकी एकाची वर्णी लावण्यात येईल. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेच्या काळात संधी घेऊन काय करावे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेता जमीर कादरी यांच्यावर निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवाराने एकानंतर एक गुन्हे दाखल केले. एका गुन्ह्यात तर त्यांना हर्सूल कारागृहसुद्धा बघावे लागले. यावेळी पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला नाही. नंतर त्यांना विरोधी पक्षनेतेपद आठ महिन्यांसाठी देऊन समजूत घालण्यात आली; पण त्यांच्या मनातील घुसमट आजही कायम आहे.
माजी विरोधी पक्षनेते असलेले फेरोज खान यांना राजाबाजार येथील दंगलप्रकरणी पक्षनेत्यांनीच सिटीचौक पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. दंगलीशी आपला काडीमात्र संबध नाही, नाहक आपल्याला व कुटुंबियांना मानसिक त्रास सहन करावा लागला. ५५ दिवस हर्सूल कारागृहात काढावे लागले. त्यामुळे त्यांनीही उघडपणे पक्षातील काही नेत्यांना विरोध सुरू केला आहे. पूर्व विधानसभा मतदारसंघात आपणच उमेदवार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. शताब्दीनगर वॉर्डातून निवडून आलेले जहाँगीर खान ऊर्फ अज्जू भाई यांनीही सोशल मीडियावर अलीकडे एक व्हिडिओ व्हायरल करून पक्षनेत्यांविरुद्ध उघडपणे बंडाचा झेंडा रोवला. नंतर एका कार्यक्रमात पक्षनेत्यांनी त्यांच्यासोबत दिलजमाईसुद्धा करून घेतली. आजही ज्येष्ठ नगरसेवक पक्षाच्या कार्यक्रमांना हजर नसतात.
क्षणाक्षणाला पक्षाची अग्निपरीक्षामहापालिकेच्या राजकारणात एमआयएम पक्ष अत्यंत नवखा असल्याने क्षणाक्षणाला टीका सहन करावी लागली. स्थायी समिती सभापतीपदासाठी एमआयएमने उमेदवारच दिला नाही. त्यामुळे एकदा प्रचंड टीका झाली. त्यानंतर आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावर अविश्वास ठराव आणला. सेना-भाजप युतीच्या ठरावाला एमआयएमने पाठिंबा देऊन टीकाकारांचा रोष ओढावून घेतला होता. बायजीपुरा येथील नगरसेवक शेख जफर यांना ट्रक चोरीच्या मोठ्या रॅकेट प्रकरणात अटक झाली होती. या प्रकरणातही पक्षाला प्रचंड नाचक्की सहन करावी लागली. पक्षातील काही नगरसेवकांनी जफर यांना पक्षातून हाकलून द्या, अशी मागणी केली. मात्र, काही पक्षनेत्यांनी शांत राहण्याचा सल्ला दिला.
नगरसेवक सय्यद मतीन यांना अलीकडेच हद्दपार करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली. ही कारवाई थांबविण्यासाठी पक्षनेत्यांना बराच त्रास सहन करावा लागला. मतीन यांच्या खाजगी आयुष्यावरही सोशल मीडियावर बरीच चिखलफेक झाली. त्यामुळेही पक्षाला बराच मानसिक त्रास सहन करावा लागला. मनपा अधिकाऱ्यांना खुर्ची उचलून मारण्याचा प्रयत्न करणे, महापौरांच्या अंगावर खुर्च्या भिरकावणे, अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा निर्माण करणे आदी कामे नगरसेवकांकडून वारंवार होतात. त्यामुळे पक्षाला उत्तर काय द्यावे, असा प्रश्न पडतो. पक्षाचे २५ आणि एका अपक्ष नगरसेवकाला सांभाळताना पक्षनेत्यांच्या नाकीनऊ येत आहे. पक्षसंघटन सांभाळाना महापालिकेचे राजकारण सांभाळणे पक्षाला सध्या जड जात आहे.
ओवेसी यांनी खडसावलेमतीन यांच्यावर हल्ला झाल्यानंतर एमआयएम कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुखांना फोन केला. खा. असदोद्दीन ओवेसी यांनी मतीन यांच्या मुद्यावर कार्यकर्त्याला कमालीचे खडसावले. वारंवार सूचना देऊनही मतीन यांच्यात सुधारणा होत नाही. त्यांच्यामुळे पक्षाची प्रचंड बदनामी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ही आॅडिओ क्लिप दोन दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
मतीनवर कारवाई अटळएमआयएम पक्षाची विचारसरणी चांगली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्या, तर निश्चितच कारवाईला सामोरे जावे लागेल. मतीन यांनाही कळून चुकले असेल की, आता आपल्यावर कारवाई अटळ आहे. त्यामुळे त्यांनी आतापासूनच मी पक्ष सोडणार, असे सांगणे सुरू केले असेल. ज्या कामामुळे पक्षाची प्रचंड बदनामी होत असेल ते काम मीसुद्धा केल्यास पक्ष माझ्यावरही कारवाई करणारच.-नासेर सिद्दीकी, गटनेता-एमआयएम