औरंगाबाद : कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य कर्मचारी आणि रुग्णांशिवाय कोणीही ये-जा करता कामा नये; परंतु शहरातील कोविड सेंटर्समध्ये कोणीही अगदी सहजपणे जात आहे. रुग्णांना भेटत आहे, गप्पा मारत आहे. नातेवाइकांनी आणलेले जेवणाचे डबे घेण्यासाठी रुग्णही थेट प्रवेशद्वारापर्यंत येतात. नातेवाइकांशी संवाद साधत उभे राहतात; परंतु त्यांना साधे काेणी हटकत नाही. कोविड सेंटर्सची अवस्था म्हणजे एकप्रकारे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून रुग्णांना अशा सेंटर्समध्ये ठेवले जाते; पण कोरोनाविषयीची भीती संपलेली आहे, असेच काहीसे चित्र कोविड सेंटरवर रुग्णांना बिनधास्तपणे भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांना पाहून म्हणण्याची वेळ येत आहे. कोरोना रुग्णांना आधार मिळावा यासाठी नातेवाईक जेवणाचा डबा पोहोचवितात. ही बाब महत्त्वपूर्ण आहे; परंतु हे डबे प्रवेशद्वारावरून रुग्णांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे; परंतु प्रत्यक्षात डबे देण्यासाठी नातेवाईकच थेट आतमध्ये पोहोचतात, तर कधी रुग्णच प्रवेशद्वारापर्यंत येत आहेत. त्यांना कोणीही अडवत नाही. नातेवाईक रिकामे झालेले डबेही घरी घेऊन जात आहेत. यातून संसर्ग फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
----
किलेअर्क कोविड केअर सेंटर
रुग्णांशी गप्पा मारण्यात नातेवाईक व्यस्त
दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास किलेअर्क कोविड केअर सेंटरच्या आवारात रांगेमध्ये उभे राहून रुग्ण जेवणाची पाकिटे घेत होते. त्याचवेळी काही रुग्णांचे नातेवाईक डबे घेऊन आले होते. गेटमध्ये प्रवेश करून डबे देऊन नातेवाईक रुग्णांशी गप्पा मारण्यात व्यस्त झाले होते. याविषयी काही नातेवाइकांना विचारले असता, आम्ही सर्व काळजी घेऊनच रुग्णाला भेटत असल्याचे सांगितले. नातेवाइकांना गेटवरच थांबविण्याची तसदी कोणताही कर्मचारी घेत नव्हता.
---------
पी.ई.एस. इंजिनिअरिंग काॅलेज कोविड केअर सेंटर
डबा घेण्यासाठी रुग्ण येतात बाहेर
पी.ई.एस. कोविड केअर सेंटरच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणीही सुरक्षारक्षक नव्हता. त्यामुळे नातेवाईक थेट इमारतीच्या प्रवेशद्वारापर्यंत सहज जात होते. याठिकाणी रुग्णच बाहेर येऊन नातेवाइकांकडून डबे घेत असल्याचे दिसून आले. डबा घेतल्यानंतर काही मिनिटे नातेवाईक-रुग्ण बोलत थांबतात. अनेकदा नातेवाईक थेट आतमध्ये जातात, त्यामुळे आम्ही लक्ष ठेवत असतो, असे येथील कर्मचाऱ्याने सांगितले.
---------
सूचना केली जाईल
सध्या रुग्णसंख्या अधिक आहे. रुग्णाला जेवणाचा डबा देण्यासाठी नातेवाईक येतात. तेव्हा रुग्णाला थेट फोन करून गेटजवळ बोलावून घेतात. इमारतीच्या आतमध्ये नातेवाईक येत नाहीत. कोविड केअर सेंटरवर सुरक्षारक्षक असतात. यासंदर्भात सेंटरवरील कर्मचाऱ्यांनाही सूचना केल्या जातील.
- आरोग्य अधिकारी, मनपा
-----
शहरातील कोविड केअर सेंटर्स-११
दाखल रुग्णांची संख्या-१,९६५