कोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातकच
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : जिभेचे चोचले पुरविण्यासाठी चायनीज पदार्थ खाणाऱ्यांची संख्या वाढली, तशी विक्रेत्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ झाली आहे. मात्र, हे पदार्थ खाणाऱ्या शौकिनांनो थोडी सावधानता बाळगा. कारण, टेस्टिंग पावडर म्हणून ओळखला जाणारा अजिनोमोटो आरोग्यासाठी हानिकारक असताना तो चायनीज पदार्थ बनविताना सर्रासपणे वापरला जातो. त्यामुळे तुमचे पोट बिघडू शकते.
चायनीज पदार्थ विशेषत: लहान मुले व तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. चायनीज पदार्थाच्या हातगाडीवर किंवा हॉटेलमध्ये खवय्यांची नेहमी रेलचेल बघण्यास मिळते. ती गाडी एखाद्या गल्लीच्या कोपऱ्यात जरी असली, तरी तिथे खवय्यांचा घोळका दिसून येतो. खवय्यांच्या चिभेचे चोचले पुरविणाऱ्या विशिष्ट चवीमुळे चायनीज पदार्थ खाल्ले जातात. या विशिष्ट चवीसाठीच अजिनोमोटो वापरले जाते. मिठासारखा याचा वापर होतोे. पण, सातत्याने हे खाण्यात आले, तर पोटाचे आजार बळावतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चौकट
काय आहे अजिनोमोटो
अजिनोमोटोला मोनो सोडियम ग्लुटामिट (एमएसजी) असे म्हणतात. ग्लुटामिट सीडचे ते सोडियम मीठ आहे. हे नैसर्गिकरीत्या पदार्थ वापरून निर्मित केलेले रासायनिक उत्पादन आहे. चायनीज पदार्थ किंवा हॉटेलमध्ये भाजीला चव येण्याकरिता याचा वापर होतो.
चौकट
म्हणून चायनीज खाणे टाळा
मिठासारखा याचा वापर चायनीज पदार्थांमध्ये केला जातो. अजिनोमोटोचा वापर केलेले पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्याने पोटाचे विकार होतात. तसेच हृदयविकाराचा धोका वाढतो. आतडे, पोटाचा कर्करोगसुद्धा होण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
चौकट
वारंवार खाल्ल्याने शरीरावर होतो परिणाम
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातक असतो. तसेच अजिनोमोटो असलेले अन्नपदार्थ वारंवार खात राहिल्याने त्याचे परिणाम, शरीरावर दिसून येतात. आठवड्यातून एखाद्या वेळेस अजिनोमोटो असलेेले चायनीज पदार्थ खाल्ले तर हरकत नाही. मात्र, सातत्याने अनेक वर्षे असे पदार्थ खाल्ले, तर पोटाचे विकार होऊ शकतात. पोट विकाराच्या अनेक कारणापैकी हे एक कारण ठरू शकते.
डॉ. अतुल देशपांडे, पोटविकार तज्ज्ञ