प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : चटपटीत, झणझणीत पदार्थ खायला प्रत्येकाला आवडते. हॉटेल किंवा हातगाडीवर खमंग भजे, कचोरी किंवा समोसे हे तेलकट पदार्थ असले तरी चवीने खाल्ले जातात. मात्र, वारंवार तळलेल्या खाद्यतेलातील पदार्थ खात असाल तर सावधान... जिभेचे चोचले पुरविण्याच्या नादात तुमच्या शरीरात वाईट कोलेस्टेरॉल वाढू शकते आणि कालांतराने हृदयविकार किंवा कॅन्सरचा धोका होऊ शकतो.
हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल. काही जण असेही म्हणतील की, आम्ही अनेक वर्षांपासून हॉटेलमधील चटपटीत पदार्थ खातो; पण आजपर्यंत काही झाले नाही, तर काहीजणांना हे बकवासही वाटेल. पण लक्षात घ्या वारंवार तळलेल्या खाद्यतेलातील पदार्थ खाणे धोकादायक आहे हे सत्य आहे. हॉटेलमध्ये एका कढईत एकदाच खाद्यतेल टाकून त्यास वारंवार तापविले जाते. त्यातून अनेक किलो भजे, समोसा, कचोरी, जिलेबी आदी पदार्थ तळले जातात. याचा कालांतराने गंभीर परिणाम खवय्यांच्या शरीरावर होत आहे हे निदर्शनात आल्यामुळे केंद्र सरकारने २०१९ पासून खाद्यतेलाच्या पुनर्वापराबाबत नवे नियम लागू केले आहेत.
चौकट
आरोग्याला घातक
वारंवार तळलेल्या तेलातील खाद्यपदार्थ सातत्याने खाण्यात आले की, शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. हृदयाला आणि मूत्रपिंड विकाराचा धोका निर्माण होतो.
चौकट
रस्त्यावर न खाल्लेलेच बरे
हॉटेल असो वा रस्त्याच्या कडेला टपरी, हातगाडी तिथे एकदा कडाईत तेल घेतले की, त्या तेलास वारंवार तापवून त्यातून अनेक किलो पदार्थ तळून काढले जातात. पैसे देऊन आपले आरोग्य खराब करून घेण्यापेक्षा अशा विक्रेत्यांकडून चटपटीत पदार्थ न खरेदी करता घरीच तयार करून खाल्लेले कधीही चांगले.
चौकट
हृदयात ब्लॉकेज निर्माण होऊ शकते
तसेच प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये ट्रायग्लिसराइड्स भरपूर प्रमाणात असतात. खाद्यतेल उकळताना त्याचे ऑक्सिडेशन होऊन त्यात फ्री रेडिकल्स तयार होतात. हेच रेडिकल्स शरीरातील पेशींना मारक ठरू शकते. हृदयात ब्लॉकेज निर्माण होणे, हृदयाचा झटका येण्यापासून ते कॅन्सरपर्यंतचा धोका निर्माण होऊ शकतो.
- डॉ. तुषार चुडीवाल,
अतिरेक टाळा
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातकच ठरतो. तसेच वारंवार एकाच तेलाला तापवून त्यातून तयार झालेले खाद्यपदार्थ वारंवार खाण्यात आले की, त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतातच. शक्यतो हातगाड्या, हॉटेलवरील खाद्यपदार्थ वारंवार खाणे टाळा. महिन्यातून दोन वेळेला असे पदार्थ खाल्लेले पुरेसे.
- डाॅ. संदीप सानप
चौकट
२५ डिग्रीपेक्षा जास्त तापल्यास तेल होते खराब
खाद्यतेलाची गुणवत्ता तपासणीसाठी एक उपकरण मिळते. एखादे खाद्यतेल २५ डिग्रीपेक्षा जास्त तापले तर ते खराब होते. असे खाद्यतेल बायोडिझेल कंपन्यांना विकता येते. मात्र, त्याचा वापर पुन्हा पदार्थ तयार केला तर कायद्याने दंडात्मक कारवाई होऊ शकते. जास्तीत जास्त दहा लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.
- एस.व्ही. कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन.
चौकट
एकाही विक्रेत्यावर नाही कारवाई
खाद्यतेलाचा वारंवार पुनर्वापर केल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने अजून एकाही विक्रेत्यावर कारवाई केलेली नाही. सध्या अन्न प्रशासन शहरातील हॉटेलमध्ये तपासणी करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.