औरंगाबाद : जीवनावश्यक वस्तूंमध्ये महागाईने शिरकाव केला आहे. खाद्यतेलाच्या भावात भडका उडाला आहे. हरभरा डाळ आणि बेसनपिठाचे दरही वधारले आहेत. कोरोनाशी लढतालढता आता सर्वसामान्य नागरिकांना महागाईशी दोन हात करावे लागत आहेत.
मागील आठवडाभरात लिटरमागे ५ ते ८ रुपयांपर्यंत खाद्यतेलाचे भाव वाढले असले तरी मार्च महिन्याच्या तुलनेत लिटरमागे १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. मार्च महिन्यात ७८ ते १५० रुपये प्रतिलिटरदरम्यान विक्री होणारे खाद्यतेल सध्या ९० ते १६५ रुपयांनी विकले जात आहे. सूर्यफूल तेल मागील ६ महिन्यांत ३० रुपयांनी कडाडून सध्या ११० रुपये लिटर विकत आहे. नवीन करडीची आवक फेब्रुवारी महिन्यात होईल. मात्र, सध्या ढेपीचे भाव गडगडल्याने करडी तेल महाग झाले. आॅक्टोबर महिन्यात नवीन सरकी, सोयाबीनची आवक सुरू होईल.
डाळीमध्ये सर्वाधिक हरभरा डाळ विकली जाते. लॉकडाऊनमुळे आॅस्ट्रेलिया व टांझानिया येथून हरभऱ्याची आवक झाली नाही. सरकारकडे मागील हंगामातील हरभरा डाळ मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, सार्वजनिक योजनेंतर्गत वितरणासाठी साठा ठेवण्यात आला आहे. यामुळे डाळ किलोमागे मागील आठवड्यात ५ रुपयांनी वधारली. जर लॉकडाऊनआधीचा विचार केल्यास हरभरा डाळीत १० रुपयांनी तेजी आली. परिणामी बेसनही ८ रुपयांनी वधारले. हरभरा डाळ ६४ ते ६६ रुपये, तर बेसन ८० ते ८४ रुपये विकले जात आहे. अन्य डाळींचे भाव स्थिर आहेत.
तुलनात्मक दरखाद्यतेल ३० मार्च (प्रतिलिटर) ९ सप्टेंबरकरडी तेल १४५-१५० रुपये १६०-१६५ रुपयेशेंगदाणा तेल ११५-१२० १४५-१५०सरकी तेल ८० ९२सोयाबीन तेल ८० ९२पामतेल ७८ ९०सूर्यफूल तेल ८० ११०वनस्पती तूप ६८ ९० हरभरा डाळ ५४-५६ ६४-६६बेसन ७४-७६ ८०-८४