औरंगाबाद : केंद्र सरकार ज्या पद्धतीने ईडीच्या कारवाया करीत आहे, आणि राज्य सरकारकडूनही त्यांना जसं उत्तर दिले जाते,त्यावरून तर हे राजकीय टोळी युद्धच असल्याचे परखड मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
शेट्टी पुढे बोलताना म्हणाले, ईडी कारवायांवरून सत्ताधारी आणि भाजप यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोप होताना दिसतात. ईडीच्या कारवाया काही भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये डांबण्यासाठी होत नसून त्या विरोधकांना धडा शिकविण्यासाठी केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की,यांना जर खरंच भ्रष्टाचारविरोधात कारवाई करायची असेल तर, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या पीक विमा कंपन्यांवर कारवाई का करीत नाही,असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
४ एप्रिल रोजी महाविकास आघाडीवर निर्णयराज्यातील आघाडी सरकारला आपण पाठिंबा दिला आहे. सरकारच्या अडीच वर्षाच्या कामगिरीची मीमांसा करण्यासाठी संघटनेची बैठक कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भोयर यांनी संघटनेच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.