नांदेड : जि़ प़ शिक्षण विभागातील अनेक कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता अचानकपणे शिक्षण विभागास भेट देवून उपस्थित कर्मचारी-अधिकाऱ्यांची हजेरी घेतली़ मंगळवारी सभापती हे आपल्या दालनात असताना अनेक कर्मचारी शिक्षण विभागात हजर नसल्याची तक्रार काही अभ्यागतांनी केली़ याची तत्काळ दखल घेत सभापती बेळगे हे शिक्षण विभागात दाखल झाले़ त्यांनी तेथे विभागाची हजेरी पुस्तिका तसेच हालचाल रजिस्टर मागितले़ उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती त्यांनी घेतली़ शिक्षण विभागातील ४२ कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी गैरहजर असल्याची बाब यावेळी उघड झाली़ जिल्हाभरातून नागरिक आपल्या कामासाठी येथे येतात़ त्यावेळी कर्मचारी नसेल तर त्यांची गैरसोय होते़ ही बाब कर्मचाऱ्यांनी ध्यानात धरून कार्यालय सोडू नये अशी सूचना केली़ तसेच उपस्थित शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी शिवाजीराव खुडे, वाघमारे यांनीही या बाबीकडे लक्ष ठेवण्याची मागणी केली़ कार्यालयात बायोमेट्रीक हजेरी असली तरीही उपस्थितीचे वेगळे रजिस्टर करण्याचे आदेश त्यांनी दिले़ यापुढे असा प्रकार आढळल्यास कारवाईचा इशाराही बेळगे यांनी दिला़ शिक्षण विभाग या ना त्या कारणामुळे चर्चेत असतोच़ या विभागाची प्रतिमा सुधारण्याची जबाबदारी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवरही असल्याचे बेळगे म्हणाले़ यावेळी पुरुषोत्तम धोंडगे, प्रवीण पाटील चिखलीकर, पवार, महाजन, बोडके आदींचीही उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)
शिक्षण विभागाची झाडाझडती
By admin | Published: December 15, 2015 11:51 PM