छत्रपती संभाजीनगर : विदेशात शिकून आलेल्या उद्योजकाच्या मुलास बीड बायपासवरील प्रसिद्ध महाविद्यालयाच्या शेजारी थाटलेल्या अभ्यासिकेतून विदेशी ओजी-कुश (हायब्रिड) गांजाची विक्री करताना अमली पदार्थ प्रतिबंधक शाखेच्या (नार्कोटिक्स) पथकाने पकडले. त्याच्याकडून ४ लाख २८ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. त्याने दिलेल्या माहितीवरून देशी गांजाची विक्री करणाऱ्या अन्य एकासही या पथकाने पकडले. दोघांविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
प्रशील हिमांशू ब्रह्मा (२९, रा. ४० ग्रीन्स, कांचनवाडी) याच्यासह प्रकाश सलामपुरे (रा. गोलवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, प्रशील हा ब्रिटनमध्ये शिक्षण घेऊन आला आहे. त्याने बीड बायपास परिसरातील महाविद्यालयाशेजारीच ब्रह्मा अभ्यासिका सुरू केली. तो ॲनिमेशन अकॅडमीही चालवत होता. एनडीपीएसच्या पथकास अभ्यासिकेत विदेशी गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, अंमलदार महेश उगले, जाधव यांच्यासह पथकाने अभ्यासिकेवर छापा टाकला. तेव्हा प्रशीलकडे पिशवीत २११ ग्रॅम विदेशी गांजा (ओजी-कुश) सापडला. त्यातील चिले वर्डे आणि पर्पल स्कुन्क हायब्रिड टीएचजी : १८-२२ टक्के, सीबीडी : २ टक्के, जी :१.०० नावाच्या पुडीवर प्रॉडक्ट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि वैद्यकीय वापरासाठी असे स्टिकर लावलेले होते. हा गांजा नाशिक येथील एजंट डॉ. ग्रीन याच्याकडून आणून विक्री केल्याची त्याने कबुली दिली. प्रकाश सलमापुरे हा देशी गांजा पुरवत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पथकाने गोलवाडी भागातील वॉटर पंपिंग स्टेशनच्या परिसरात छापा मारून त्यालाही पकडले.
गांजाची दोन झाडे जप्तआरोपी प्रशीलने चौकशीत विदेशी व देशी गांजाचीदेखील विक्री करत असल्याचे सांगितले. गोलवाडी येथील मनपाच्या पम्पिंग स्टेशन आवारात प्रकाशने गांजाची झाडे लावून तेथून गांजाचा पुरवठा केल्याची माहिती दिली. पोलिसांनी पम्पिंग स्टेशन गाठले. कंपाउंडच्या आत पेरूच्या झाडांमागे दोन गांजाची झाडे आढळली. १ लाख २० हजार ५४० रुपये किमतीची ही झाडे तोडून जप्त केली.
महाविद्यालयीन विद्यार्थी संपर्कातआरोपी प्रशिलचा परदेशात एक ग्रुप होता. त्या ठिकाणीच त्याने ओजी-कुश गांजाचे सेवन केले होते. बीए हॉटेल-मोटेल प्रशासन, व्यवस्थापनाची पदवी घेऊन प्रशिल लॉकडाउनच्या काळात देशात परतला. त्याने या महाविद्यालयाच्या बाजूलाच ॲनिमेशन इन्स्टिट्यूट आणि अभ्यासिका सुरू केली. त्या ठिकाणी तो २ ते ३ हजार रुपये प्रतिग्रॅमने नाशिकचा पेडलर डॉ. ग्रीन याच्याकडून ओजी-कुश गांजा आणत होता. हायप्रोफाईल विद्यार्थी आणि शहरातील काही लोकांना ५ ते ६ हजार रुपये प्रतिग्रॅम या भावाने विक्री करत होता. अनेक हायप्रोफाइल घरातील विद्यार्थी त्याच्या संपर्कात होते. प्रशीलचे आई-वडील एका नामांकित कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहेत.