औरंगाबाद : हडकोमध्ये इंग्रजी शाळा चालविणाऱ्या संस्थाचालकाची दोरीने गळा आवळून आणि धारदार शस्त्राने चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हिमायतबागेत उघडकीस आली. ही हत्या आर्थिक व्यवहारातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
विश्वास चंद्रशेखर सुरडकर (वय ३३,रा.श्रीकृष्णनगर, हडको)असे मृताचे नाव आहे. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, विश्वास सुरडकर यांची हडकोतील सलीमअली सरोवर परिसरात सुरडकर यांची सनराईज इंग्लीश स्कुल आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास विश्वास हे घरी होते. त्यावेळी अचानक त्यांना कोणाचातरी फोन आला. त्यानंतर ते घराबाहेर पडले. नंतर रात्री घरी परतलेच नाही. त्यांचा मोबाईलवर त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता.
दरम्यान रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हिमायतबाग परिसरात गस्तीवरील चौकीदाराला बांबूबेट मधील बारव शेजारी एक अनोळखी व्यक्तीचा गळा चिरून आणि गळा आवळून खून करण्यात आल्याचे दिसले. चौकीदाराने या घटनेची माहिती तातडीने बेगमपुरा पोलिसांना फोन करून कळविली. पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहायक आयुक्त एच.एस.भापकर, निरीक्षक राजश्री आडे, उपनिरीक्षक सरवर शेख , उपनिरीक्षक विजय जाधव आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, श्वान पथक आणि ठस्से तज्ज्ञ, फॉरेन्सिक सायन्स विभागाच्या तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करून महत्वाचे पुरावे गोळा केले.
मृतदेहाशेजारील फोनवरून कॉल लिस्टमधील एका व्यक्तीला फोन लावला तेव्हा तो फोन मृताचा भाऊ विनोद सुरडकर यांना लागला. विनोद यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. मृतदेह पाहून विनोद यांनी हंबरडा फोडला आणि मृत हा त्यांचा भाऊ विश्वास असल्याचे पोलिसांना सांगितले. पैशाच्या वादातून राजू दीक्षित यांनी हा खून केला असावा, असा संशय विनोदने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले. विश्वास आणि राजू यांच्यात अनेक वर्षापासून पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद सुरू आहे.यातूनच ही हत्या झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी राजूचा शोध सुरू केला.