खुलताबाद : निष्काळजीपणा व कामात हलगर्जीपणा केल्यामुळे शॉक लागून एकाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या लाईनमन शेख अन्वर शेख तुराब यास खुलताबाद येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश एन. बी. बन्सल यांनी एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.१२ आॅक्टोबर २०११ रोजी लाईनमन शेख अन्वर हा सतीश जाधव यास म्हैसमाळ येथे वीज दुरुस्तीसाठी सोबत घेऊन गेला होता. विद्युत खांबावर सतीश जाधव यास चढविले व त्यावेळेस शेख अन्वर याच्या निष्काळजी व हलगर्जीपणामुळे अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला व सतीश जाधव शॉक लागून खाली पडला. यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्यानंतर वरीलप्रमाणे शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड. महेश मालानी यांनी कामकाज पाहिले. त्यांना एस.डी. सोनवणे यांनी सहकार्य केले.