औरंगाबाद : जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक मैदानातून उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी अनेकांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेनंतर चित्र स्पष्ट होईल, तसेच किती ग्रामपंचायती बिनविरोध होतील, हेदेखील स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यात या निवडणुकीसाठी १६ हजार ९४२ उमेदवारांनी १६ हजार ९५७ अर्ज दाखल केले आहेत. ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पॅनलच्या आडून राजकीय पक्ष पॅनल बिनविरोध यावे, यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत.३१ डिसेंबर २०२० रोजी उमेदवारी अर्जांच्या छाननीअंती ३७१ अर्ज बाद झाले. ४ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. याच दिवशी उमेदवरांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींमधील २,०९० प्रभागांसाठी ५,६८३ सदस्य संख्या राहणार आहे. या निवडणुकीमध्ये १२ लाख ४६ हजार ५३६ मतदार ग्रामपंचायत सदस्य निवडणार आहेत. १५ जानेवारी रोजी निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
राजकीय पक्षांनीही लावली ताकदराज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे तिन्ही पक्ष ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भाजपचेही सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये स्पर्धा लागल्याचे दिसत आहे.