छत्रपती संभाजीनगर : कायद्याच्या विद्यार्थ्यांनी तर्क आणि संवादाला महत्त्व देत कायम न्यायासाठी काम करीत असल्याची जाणीव ठेवावी. ज्ञानातून माणसाला अहंकार येतो. तो कधीही येऊ देऊ नका, तरच तुम्ही खऱ्या अर्थाने न्याय प्रस्थापित करू शकाल, असे आवाहन सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये केले.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत सोहळा विद्यापीठात साजरा झाला. यावेळी मार्गदर्शन करताना सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड बोलत होते. ते म्हणाले, पूर्वीचा कायदा स्वातंत्र्यसैनिकांना मंडालेपासून अंदमानपर्यंत शिक्षा देण्यासाठी पाठवत होता. तुमच्या आमच्यावर हुकूमत गाजविण्यासाठी वापरला जात होता. आजचा कायदा हा न्याय देण्यासाठी आहे. तुम्ही कायद्याची व्याख्या कशी करता, त्यानुसार ते ठरत असते.
हैदराबाद संस्थान भारतात विलीन होणे गरजेचे होते. या प्रांतामध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊन सर्वांना समान हक्क व न्याय देईल. ते मुक्तिसंग्राम दिनामुळे साध्य झाले. कायद्याच्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की, न्यायालयात जाऊन खटले लढवणे, युक्तिवाद करणे एवढाच वाव या क्षेत्रात आहे. पण, तसे नाही. १९८२ साली मी वकिलीला सुरुवात केली, तेव्हा मर्यादित वाव होता. आता कक्षा रुंदावल्या आहेत. तुमचे ध्येय समजून घेऊन काम करा, असेही ते म्हणाले.
टेक वर्क सिरिअसलीविद्यार्थ्यांनी आयुष्यात जे काम करतो ते गांभीर्याने घेतले पाहिजे. मात्र, स्वत:ला तेवढे गंभीरपणे घेऊ नका, असा सल्लाही सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांनी दिला. मराठवाड्यात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केल्याचा उल्लेखही त्यांनी सुरुवातीला केला.