नांदेड : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी मंगळवारी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. देगलूर नाका परिसरातील ईदगाह मैदानावर सकाळी साडे नऊ वाजता रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी सामूहिक प्रार्थना केली़ हाफेज सलीम मिल्ली यांनी प्रार्थनेचे पठन केले़ त्यानंतर मौलाना मोईन खासमी यांनी बयान खुदबा देवून विश्व शांती व कल्याणाची प्रार्थना केली़पवित्र रमजान महिन्यात एक महिना उपवास केल्यानंतर ईदनिमित्त आज एकमेकांना गळाभेट करुन शुभेच्छा दिल्या़ यावेळी हाफेज सलीम खासमी यांनी देशातील सर्व जातीच्या नागरीकांनी एकोप्याने रहावे, तसेच शेजारील देशांशी चांगले संबध ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली़ पॅलेस्टाईनसाठी विशेष प्रार्थनाही यावेळी करण्यात आली़ सामूहिक प्रार्थनेनंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या़ यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पालकमंत्री डी़पी़सावंत, आ़ओमप्रकाश पोकर्णा, आ़अमरनाथ राजूरकर, महापौर अब्दुल सत्तार, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपायुक्त डॉ़निशिकांत देशपांडे, पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या़ ईदगाह परिसरात प्रशासनाच्या वतीने विशेष मंडप टाकण्यात आला होता़ शहरातील वेगवेगळ्या भागातही संघटनांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. ईदनिमित्त सोमवारी रात्री बर्की चौक, देगलूर नाका, वजिराबाद, श्रीनगर, शिवाजीनगर आदी भागातील बाजारपेठ रात्रभर सुरु होती़ अतिरिक्त बंदोबस्तही तैनात केला होता़ (प्रतिनिधी)
ईद उत्साहात
By admin | Published: July 30, 2014 12:59 AM