उदगीर/ अहमदपूर/ निलंगा/ औसा : जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा या चार नगर परिषदांच्या निवडणुका येत्या १४ डिसेंबर रोजी होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी उदगीर आणि अहमदपुरात केवळ ८ अर्ज दाखल झाले आहेत़ निलंगा आणि औशात एकाही इच्छुकाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही़नगर परिषद निवडणुकीसाठी शनिवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे़ १९ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे़ त्यामुळे आता केवळ पाच दिवस शिल्लक असल्याने मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होईल, त्यामुळे गर्दी वाढेल, अशी अपेक्षा होती़ परंतु, उदगीर व अहमदपूर वगळता अन्य दोन्ही ठिकाणी एकाही इच्छुकाने आपली उमेदवारी दाखल केली नाही़उदगीरच्या प्रभाग १ ब मधून मगरबी याहिया मुस्तफा (अपक्ष), प्रभाग २ ब मधून राजा पटेल खाजा बेगम याहिया (अपक्ष), प्रभाग ४ ब मधून शेख शबाना बेगम फैय्याजोदी (अपक्ष), प्रभाग ७ ब मधून नीळकंठ शिवशय्या स्वामी (अपक्ष), प्रभाग १० ब मधून मंजुळा व्यंकटी उदबाळे (अपक्ष) या पाच जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना व तिसरी आघाडी या प्रमुख राजकीय पक्षांकडून एकही अर्ज मंगळवारपर्यंत दाखल करण्यात आलेला नाही़ शेवटच्या चार दिवसांमध्ये किती व कोणाचे अर्ज दाखल होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़ अहमदपूर नगरपालिकेत अकरा प्रभाग असून २३ गट आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी केवळ तिघांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले आहेत़ त्यात प्रभाग ८ (ब) मधून साजीदभाई मित्र मंडळाकडून सय्यद लाल सरवर यांनी, प्रभाग १ ( ब ) मधून आमदार विनायकराव पाटील आघाडीकडून रहिम पठाण यांनी, प्रभाग ३ मधून भाजपाकडून गयादेवी सिरसाठ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास इच्छुकांची गर्दी होईल अशी अपेक्षा होती़ (वार्ताहरांकडून)
चार पालिकांसाठी आठ अर्ज
By admin | Published: November 16, 2016 12:23 AM