विद्यार्थ्यांची कुचंबना : महाविद्यालयीन अध्यापनाचे कार्य रखडले
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ११५ अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या ८१७ जागा रिक्त आहेत, तर दुसरीकडे तासिका तत्वावरील प्राध्यपकांच्या नियुक्तीस शासनाकडून परवानगी मिळत नसल्यामुळे सध्या ऑनलाईन शिक्षण प्रभावित झाले आहे.
कोरोनामुळे मागील दहा महिन्यांपासून संपूर्ण शिक्षणक्षेत्र विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे ४ मे २०१९ पासून सर्व शासकीय नोकरभरतीबरोबरच महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतरांच्या भरतीवरही शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांत विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये सेवानिवृत्ती तसेच अन्य काही कारणांमुळे शिक्षक- शिक्षकेतरांच्या एकूण १४३९ जागा रिक्त आहेत. यामध्ये प्राध्यापकांच्या ८१७, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ६२२ जागांचा समावेश आहे.
अलिकडे शासनाने इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंत शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास हिरवा कंदील दिला असून लवकरच वरिष्ठ महाविद्यालयेही सुरु होतील. सध्या वरिष्ठ महाविद्यालयांंना ऑनलाईन अध्यापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, महाविद्यालयांमध्ये अनेक विषयांचे प्राध्यापक नाहीत. तासिका तत्वावरील शिक्षकही नाहीत. गेल्या वर्षांत कार्यरत तासिका तत्वावरील शिक्षकांना तरी पुनर्नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी विद्यापीठ तसेच काही महाविद्यालयांनी सहसंचालक कार्यालयामार्फत शासनाकडे केली आहे. सध्या अनेक विषयांच्या ऑनलाई तासिका होत नसल्यामुळे प्रवेशित विद्यार्थ्यांची कुचंबना होत आहे.
चौकट.....
प्राचार्यांच्या भरतीवरील बंदी उठवली, शिक्षकांची भरती कधी
शासनाने ४ मे २०१९ पासून सर्वच भरतीप्रक्रियेवर बंदी आणली असली, तरी कधी आरक्षण, तर कधी अन्य कारणांमुळे मागील चार वर्षांपासून प्राध्यापकांची भरती रखडली आहे. या महिन्यांत प्राचार्यांची पदे भरण्यास शासनान अनुमती दिली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक- शिक्षकेतरांच्या भरतीसाठी कधी मुहूर्त लागणार, असा प्रश्न नेट-सेटधारकांनी उपस्थित केला आहे.
चौकट......
प्रस्ताव आले नाहीत
यासंदर्भात उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. दिगंबर गायकवाड यांनी सांगितले की, तासिका तत्वावर शिक्षक नियुक्त करण्याच्या कोणत्याही सूचना अद्याप शासनाकडून प्राप्त नाहीत. त्यामुळे सध्या तरी महाविद्यालयांकडून तासिका तत्वावरील शिक्षकांचे प्रस्ताव आलेले नाहीत. अनुदानित महाविद्यालयांमध्ये १ ऑक्टोबर २०१७ रोजीच्या विद्यार्थी संख्येनुसार प्राध्यापकांचा कार्यभार (वर्कलोड) निश्चित केला जातो. त्यानुसार प्राध्यापकाच्या एका रिक्त जागेसाठी तासिका तत्वावर प्राध्यापकांची दोन पदे नियुक्त करता येतात.