औरंगाबाद : महापालिकेच्या स्थायी समितीमधून आज आठ सदस्य निवृत्त झाले. विद्यमान सभापती दिलीप थोरात यांच्यासह आठ सदस्यांच्या ड्रॉ पद्धतीने चिठ्ठ्या उचलण्यात आल्या. भाजप, एमआयएम, अपक्ष आघाडीचे प्रत्येकी दोन सदस्य निवृत्त झाले. काँग्रेस आणि सेनेच्या एका सदस्याला बाहेर पडावे लागले. सेनेतील एकमेव सदस्य निवृत्त झाल्याने स्थायी समितीमध्ये जाण्यासाठी पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. स्थायी समितीचा कार्यकाळ एक महिना लांबविण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपासून सुरू होता. या प्रयत्नांना यश आले नाही. नियमानुसार ३० एप्रिलपूर्वी १६ पैकी ८ सदस्य निवृत्त करावे लागणार होते. शनिवारी स्थायी समितीची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत ड्रॉ पद्धतीने सर्व १६ सदस्यांच्या चिठ्ठ्या एका डब्यात टाकण्यात आल्या. सर्वप्रथम काँग्रेसच्या रेश्मा कुरैशी यांच्या नावाची चिठ्ठी काढण्यात आली. त्यानंतर भाजपच्या कमल नरोटे यांची चिठ्ठी निघाली. तिसऱ्या क्रमांकावर एमआयएमचे इर्शाद खान, चौथ्या चिठ्ठीत अपक्ष आघाडीच्या ज्योती मोरे यांचे नाव निघाले. एमआयएमचे अज्जू नाईकवाडी यांची पाचवी चिठ्ठी निघाली. अपक्ष आघाडीचे नेता गजानन बारवाल यांनाही सहाव्या चिठ्ठीत स्थायीतून बाहेर निघावे लागले. विद्यमान सभापती दिलीप थोरात सातव्या चिठ्ठीत बाहेर पडले. शेवटची एकमेव चिठ्ठी बाकी होती. या चिठ्ठीत तरी आपले नाव निघू नये म्हणून उपस्थित नगरसेवक देवाचे नामस्मरण करीत होते. शेवटची चिठ्ठी सेनेच्या ज्योती पिंजरकर यांची निघाली. आपले नाव येताच पिंजरकर यांना आपले अश्रू आवरणे कठीण झाले होते.वर्षभर अस्थिरता...अकरा महिन्यांपूर्वी भाजपचे दिलीप थोरात स्थायी समितीच्या सभापतीपदी विराजमान झाले होते. त्यांच्या कार्यकाळात आयुक्तपदच अस्थिर होते. प्रकाश महाजन यांच्यावर अविश्वास ठराव घेऊन पाठविण्यात पदाधिकाऱ्यांना परिश्रम घ्यावे लागले. त्यानंतर केंद्रेकर यांनी तीन महिने काम पाहिले. त्यातच महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट होता. विकासाची कामे ज्या पद्धतीने व्हायला हवी होती तशी झाली नसल्याची खंत थोरात यांनी व्यक्त केली. लेखा विभागाला शिस्त लावली. ए-१ आणि रेटलिस्टची बोगस कामे बंद केली. शहर बससेवेसाठी यापुढेही आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्थायीचे आठ सदस्य निवृत्त
By admin | Published: May 01, 2016 1:32 AM