औरंगाबाद: अभ्यास करण्यासाठी मोठी बहिण रागावल्याने दोन दिवसापासून घरातून बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय मुलीचा हडको एन-११ मधील एका विहिरीत मृतदेह आढळला. या मुलीने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. सिडको ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शिल्पा रामकुमार धनगावकर( १४,रा. सुदर्शननगर, हडको)असे मृत मुलीचे नाव आहे. सिडको ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले की, शिल्पा ही परिसरातील एका शाळेत आठवीत शिकत होती. तिची मोठी बहिण बारावीमध्ये आहे. शिल्पा अभ्यासाकडे कानाडोळा करीत असल्याचे तिच्या बहिणीच्या लक्षात आले. यामुळे दोन दिवसापूर्वी रात्री शिल्पाला ती अभ्यासावरून रागावली. यानंतर ती घराबाहेर पडली,नंतर शिल्पा घरी परतलीच नाही. यामुळे नातेवाईकांनी रात्रभर तिचा शोध घेतला. मैत्रिण आणि अन्य नातेवाईकांकडे गेली नसल्याचे समजल्याने शेवटी गुरूवारी नातेवाईकांनी सिडको पोलीस ठाणे गाठून शिल्पा हरवल्याची तक्रार नोंदविली.
पोलीस आणि नातेवाईकांकडून शिल्पाचा शोध सुरू असताना आज शुक्रवारी सकाळी हडको परिसरातील स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे उद्यानात मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरीकांना शिल्पाचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला. याघटनेची माहिती लगेच सिडको पोलिसांना कळविण्यात आली. सिडको पोलिसांसोबतच शिल्पाचे नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीतून शिल्पाचा मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह शिल्पाचाच असल्याचे नातेवाईकांनी ओळखले आणि त्यांनी हंबरडा फोडला. यानंतर मृतदेह घाटी रुग्णालयात हलविण्यात आला. तेथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शिल्पा ही यापूर्वीही रागाच्या भरात घरातून निघून गेली होती. तेव्हा तिला शोधून आणल्यानंतर तिला नातेवाईकांच्या ताब्यात दिले होते. या घटनेचा तपास सिडको पोलीस करीत आहेत.