औरंगाबाद - मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे (Eknath SHinde) आज(सोमवार) औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांची कॅबिनेट मंत्री संदिपान भूमरे यांच्या पैठण गावात भव्य सभा होणार आहे. या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. या सभेला मुख्यमंत्र्यांसह केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड यांच्यासह अनेक मंत्री आणि शिंदे गटातील आमदारांची उपस्थिती आहे. येथील सभेत बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी गुवाहटीचा डायलॉग म्हणून दाखवला. तसेच, मुख्यमंत्रीएकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमनेही उधळली. यावेळी, मुख्यमंत्री शिंदेच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ त्यांनी कथित केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठवाड्याच्या पारड्यात झुकतं माप देण्यात आलं आहे. पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद देण्यात आलं. तर, तानाजी सावंत हेही कॅबिनेट मंत्री झाले. त्यामुळे, मंत्री संदीपान भुमरे यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पैठण येथे आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सभेला मोठ्या गर्दीत सुरुवात झाली असून दिग्गज नेत्यांची भाषणं सुरु आहेत. आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाषण करताना मुख्यमंत्र्याचं मोठं कौतुक केलं. तसेच, ते रात्रं-दिवस जनतेची सेवा करत असल्याचंही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी लहानपणापासूनच मोठी कष्ट उपसली आहेत. महाबळेश्वरच्या डोंगरातील, कोयना धरणाच्यावरली शेती ही तुमच्या-माझ्यासारखी नाही. त्या शेतीत बैलं चालत नाहीत, तिथं कुळव माणसानंच ओढायचा असतो, नांगुर सुद्धा माणसाचं धरायचा असतो. शिंदेसाहेबांनी स्वत: नांगुर ओढलाय. खांद्यावर दावं घेऊन कुळवं ओढलाय, चिखलात पाय बुडवून खाकी चड्डीवर भाताची रोपं पेरल्याती, एवढं कष्ट करुनसुद्ध संसार चालत नाही म्हणून ते ठाण्याला गेले. ठाण्याला गेल्यानंतर धर्मवीर आनंद दिघेंच्या आशीर्वादाने रिक्षा चालवायला सुरु केली. रात्रं-दिवस रिक्षा चालवून घराचा प्रपंच केला. म्हणूनच, एकनाथ शिंदे आज दिवसरात्र जागून काम करत आहेत. ज्या माणसाचं जीवनच जनतेच्या हितासाठी समर्पित झालंय, तो माणूस झोपणार नाही, असे म्हणत शहाजीबापू पाटीलांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली.