औरंगाबाद - राज्यात झालेल्या सत्तानाट्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल ५० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेतली. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले. बहुमत गमावल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर, मंत्रिमंडळ विस्तारही झाला. पण, बंडखोर गटात अग्रेसर असलेल्या संजय शिरसाट यांची मंत्रीपदाची संधी हुकल्याने ते नाराज झाले आहेत. तरीही एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत कौतुकास्पद असल्याचं ते सांगत आहेत.
शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल या अपेक्षेने अनेक जण मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लावून होते. त्यात ९ ऑगस्टला राज्यातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र त्यात नाव नसल्याने शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या विस्तारात स्थान मिळेल याच अपेक्षेवर शिरसाट आहे. परंतु शिरसाट यांनी मनातील खंत पुन्हा एकदा भरव्यासपीठावर बोलून दाखवली. मात्र, त्याच व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुकही केलं आहे. एकनाथ शिंदेंची काम करण्याची पद्धतच वेगळी असून भाजप आमदार अतुल सावे यांनीही त्याचा अनुभव घेतल्याचं ते म्हणाले.
मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधी मी आणि अतुल सावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे गेलो होतो. त्या माणसाची काम करण्याची पद्धत अतुल सावेंनी देखील पाहिली आहे. कितीही पत्रं आणा, तातडीने मान्यता देतात. मी सातारा देवळाईमध्ये जवळपास ७०-८० कोटी रुपयांची कामं केली आहेत. अतुल सावेंनी मंत्री होण्याआधीच एकनाथ शिंदेंकडून ५० कोटी रुपये आणले आहेत. सावेंनी कामाचं पत्र दिल्यानंतर एकनाथ शिंदेंनी लगेच स्वाक्षरी केली होती,” असा अनुभव त्यांनी जाहीर सभेत सांगितला.
अतुल सावे मागून येऊन मंत्री झाले
भाजपाचे मंत्री अतुल सावे यांच्या वडिलांसोबत मी काम केले. मात्र माझ्यानंतर अतुल सावे राजकारणात आले. राज्यमंत्री झाले, कॅबिनेट मंत्री झाले. आमच्याकडे पाहा ना. अतुल सावे मागून आले दोनदा मंत्री झाले. राजकारणात आजकाल सिनेरिटीचे काहीच राहिलेले नाही असं वाटू लागलंय असं सांगत त्यांनी व्यासपीठावरून नाराजी व्यक्त केली. आमदार शिरसाट यांच्या मतदारसंघात रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.