औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत औरंगाबाद शहरातील अनेक नेते, कार्यकर्त्यांनी काम केले. शिवसेनेसाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी त्यावेळी शिवसैनिकांमध्ये होती. काळानुसार शिवसेना बदलत गेली. आयुष्यभर आपण ज्यांच्या विरोधात लढलो, त्यांच्यासोबतच आज सत्ता स्थापन करणे हे कोणत्याही शिवसैनिकाला पटले नाही. आता अडीच वर्षांनंतर एकनाथ शिंदे यांनी जे पाऊल उचलले, ती प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातील खदखद असल्याचे मत बाळासाहेबांच्या काळातील शिवसैनिकांनी व्यक्त केले.
काँग्रेससोबत जाणे हेच चुकलेशिवसेनेच्या स्थापनेपूर्वीपासून मी काम करीत होतो. पहिला जिल्हाप्रमुख म्हणून काम केले. २०० पेक्षा जास्त केसेस माझ्यावर झाल्या. आयुष्यभर प्रस्थापित काँग्रेसशी लढलो. नंतर राष्ट्रवादीसोबत लढाई केली. अचानक सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे हे कोणत्याही शिवसैनिकाला पटले नाही. नेतृत्वापुढे कोणालाही काहीही बोलता येत नव्हते. मागील अडीच वर्षांत मंत्रालयात जिकडे तिकडे काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. आमदारांना एकमेव शिंदेच भेटत असत. मुख्यमंत्रीही भेटत नव्हते. त्यामुळे शिंदे यांनी ही टोकाची भूमिका घेतली. त्यांची ही भूमिका म्हणजे समस्त शिवसैनिकांच्या मनातील खदखद आहे.- सुभाष पाटील, पहिले शिवसेना जिल्हाप्रमुख
शिवसेना हळूहळू संपेल का?महापालिकेत १९८८ पासून २००० पर्यंत विविध पदांवर काम केले. हिंदुत्वासाठी जिवाचे रान केले. आज शिवसेनेची ही वाताहत पाहून खूपच वाईट वाटते. एकेकाळी शिवसेना म्हणजे आग होती. आज पक्षाची अवस्था बघा. शरद पवार यांनी जाणीवपूर्वक शिवसेना संपविण्यासाठी महाविकास आघाडी केली. त्याला संजय राऊत यांनी शह दिला. शिवसेनेचा प्रवास असाच सुरू राहिला तर एक दिवस खूप वाईट येईल. २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे हा निर्णय चुकला.- अविनाश कुमावत, माजी सभापती, स्थायी समिती
शिवसेना म्हणजे कडवट हिंदुत्वशिवसेना कोणत्या मुद्द्यावर वाढली तर कडवट हिंदुत्व या एकमेव शब्दावर होय. अलीकडे शिवसेनेचा प्रवास बघितला तर तो अत्यंत चुकीचा आहे. एमआयएमच्या आमदारांची मते घेतली. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही सेनेने एमआयएम नगरसेवकांची मते घेतली. बाळासाहेब नेहमी सांगत असत, काहीही झाले तरी काँग्रेससोबत जाणार नाही. शिंदे यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. शिवसैनिकांच्या मनातील ही मूळ खदखद बाहेर आली.- राधाकृष्ण गायकवाड, माजी सभागृह नेता