औरंगाबाद: मुंबई आणि ठाणे नंतर शिवसेनेला मराठवाड्याने नेहमी साथ दिली आहे. मात्र, मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचा फटका मराठवाड्यातील शिवसेनेला बसला आहे. औरंगाबादमधील सहा आमदार, उस्मानाबादमधील दोन आणि नांदेड येथील एक असे तब्बल नऊ आमदार 'नॉट रिचेबल' आहेत. यामुळे मराठवाड्यातील निष्ठावान शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता जाणवत आहे.
शिवसेनेतर्फे मराठवाड्यातून औरंगाबाद जिल्ह्यातून सहा, उस्मानाबादमधून ३, नांदेड, परभणी आणि हिंगोलीतून प्रत्येकी एक आमदार विधानसभेत गेले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मराठवाड्यातून संदीपान भुमरे यांना कॅबिनेट तर अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्री पद देण्यात आले. तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांचा विभागात कायम संपर्क राहिला आहे. मंत्री शिंदे यांनी व्यक्तिगतरीत्या लक्ष घालून मराठवाड्यातील शिवसेना आमदारांच्या मतदारसंघासाठी मोठ्याप्रमाणावर विकासनिधी दिला. याचमुळे मंत्री शिंदे यांच्या बंडखोरीला मराठवाड्यातून साथ मिळाली आहे. सेनेचा गड असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सहा आमदार नॉट रिचेबल आहेत. यात वैजापूर- रमेश बोरणारे, सिल्लोड- अब्दुल सत्तार, औरंगाबाद (पश्चिम) संजय शिरसाट, पैठण- संदीपान भुमरे यांचा समावेश आहे. तर औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मोबाईल देखील बंद असल्याने चर्चेला उधान आले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील तीनपैकी माजी मंत्री परंडाचे आमदार तानाजी सावंत, उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले हे दोघे नॉट रीचेबल आहेत. तिसरे आमदार उस्मानाबादचे कैलास पाटील मुंबईत असल्याची माहिती आहे. तर नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे देखील नॉट रिचेबल आहेत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, परभणीचे आमदार राहुल पाटील पक्ष बैठकीस हजर राहणार होते.
कट्टर शिवसैनिकांचा उद्रेक होईल नाराज आमदारांच्या मतदार संघात त्यांच्या 'नॉट रिचेबल' असल्याने नाराजी आहे. तेथील कट्टर शिवसैनिक देखील यावर लक्ष देऊन आहेत. यापूर्वी छगन भुजबळ, नारायण राणे यांच्या बंडानंतर कट्टर शिवसैनिकांचा उद्रेक झाला होता. तसा प्रकार यावेळी देखील होऊ शकतो. पण जे कोणी आमदार नाराज आहेत त्यांची मनधरणी करून. आम्ही लवकरच डॅमेज कंट्रोल करू, असा ठाम विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.