औरंगाबाद: विधानपरिषद निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याची चर्चा आहे. गुजरातमधील सुरत येथील एका हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असून त्यांच्यासोबत सेनेचे काही आमदार असल्याची माहिती आहे. या आमदारांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदार असण्याची शक्यता असून ते नॉट रिचेबल आहेत. तर अन्य एका आमदाराचा मोबाईल बंद आहे.
महाविकास आघाडी आणि शिवसेनेतील प्रभावशाली मंत्री एकनाथ शिंदे हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा विधानपरिषद मतदानाच्या पूर्वीच सुरु झाली होती. सोमवारी चुरशीच्या झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे ५ तर महाविकास आघाडीचे ५ आमदार निवडून आले. सहावा उमेदवार पडल्याने महाविकास आघाडीवर नामुष्की ओढवली आहे. पराभवाची चर्चा सुरूच असताना अचानक मंत्री शिंदे संपर्काबाहेर गेले. त्यानंतर ते सुरतला असून त्यांच्यासोबत सेनेचे काही मंत्री आणि जवळपास २५ आमदार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, मंत्री शिंदे यांच्यासोबत सेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदार असल्याची चर्चा आहे. यात कन्नड- रमेश बोरणारे, सिल्लोड- अब्दुल सत्तार, औरंगाबाद (पश्चिम) संजय शिरसाट, वैजापूर- उदयसिंग राजपूत, पैठण- संदीपान भुमरे यांचा समावेश आहे. तर औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मोबाईल देखील बंद असल्याने चर्चेला उधान आले आहे.
भरघोस विकास निधी दिलेला आमदारविशेष म्हणजे, या सर्व आमदारांना मंत्री शिंदे यांनी त्यांच्या खात्या मार्फत मोठया प्रमाणात विकासनिधी दिला आहे. कन्नड, वैजापूरमध्ये तर मंत्री शिंदे हेलिकॅप्टरने उदघाटन करण्यास आले होते. तसेच आमदार सानाज्य सिरसाट यांच्या शहरातील पश्चिम मतदारसंघात देखील त्यांनी विशेष निधी दिला होता.