छत्रपती संभाजीनगर : एक काळ असा होता की, खामनदीला पूर आला की हर्सूलच्या तलावाकडे एकतानगरातून जायचे कसे, असाच प्रश्न भेडसावायचा. परंतु कालौघात एकतानगर ही अद्ययावत वसाहत बनली आहे. एकतानगरातील चिखलाची दलदल अंतर्गत रस्त्यावर दिसते; परंतु लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांनी परिसराचा कायापालट होत आहे. आता गुंठाभर जागेला ही सोन्याची किंमत आली आहे. रस्त्यावर तर एका मिनिटाला १०० गाड्यांची वर्दळ पाहून शहरात आहोत की काय, असा भास झाल्याशिवाय राहत नाही.
हर्सूल जेलच्या मागे असलेल्या या वसाहतीत राहण्यासाठी यावे का नाही, असा प्रश्न एके काळी नागरिकांना पडत होता. राधास्वामी कॉलनी, वीणा हौसिंग सोसायटी, पंचशीलनगर, गायकवाड सोसायटी, सोनार गल्ली, जहांगीर कॉलनीत जाण्यासाठी पूर्वी नीट रस्तेही नव्हते. आता सिमेंटचे रस्ते असून, जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. आता विजेचे खांब आणि सांडपाण्याचा निचरा करणाऱ्या अंतर्गत गटारी टाकण्याची गरज आहे.
आजही टँकरचेच पाणीवीणा सोसायटीच्या नागरिकांनी स्वत: बेटरमेंट चार्ज भरून मनपाचा पूर्ण कर भरलेला असतानाही आजही टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागते किंवा बोअरवेलला फिल्टर बसवून पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. पाणीटंचाई असल्यास जारचे पाणी विकत घ्यावे लागते.-जी. वाय. जरारे, वीणा हाै. सोसायटी
गटार, मीटर, वॉटर देण्याची गरज...गायकवाड सोसायटीला रस्ते, गटार, मीटर, पाणी देण्याची गरज असून, पावसाळ्यात ये-जा करताना गैरसोयीला सामोरे जावे लागते. परंतु गत पंधरा वर्षांपेक्षा परिस्थिती बरी आहे. लोकप्रतिनिधींनी गायकवाड सोसायटीकडे विकासकामांसाठी लक्ष द्यावे.-प्रल्हाद साळवे, रहिवासी
अंतर्गत कामेपूर्वी एकतानगर परिसरात येताना रिक्षाचालकही येत नसत. मनपा व लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने विकासकामात अशीच प्रगती होऊन अंतर्गत कामे अधिक झपाट्याने पूर्ण व्हावीत.- रमेश पालोदकर, रहिवासी
रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष हवे...पावसाळ्यात वाहणाऱ्या पाण्याचे लोंढे रस्त्यावरून वाहत असल्याने सिमेंट रस्त्यांनाही खड्डे पडत आहेत. याकडे कुणी पाहणार की नाही?- सुशीलाबाई थोरात, रहिवासी
विकासासाठीच सर्व धडपड..मनपा व लोकप्रतिनिधीच्या प्रयत्नातून जलवाहिनी टाकणे सुरू असून, ड्रेनेजलाईनचेही मोठे काम सुरू आहे. परिसराच्या विकासाचा ध्यास स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे निधी वॉर्डासाठी आणला आहे.- रूपचंद वाघमारे, माजी नगरसेवक