: ज्येष्ठांनी वेशभूषा स्पर्धा गाजविली
औरंगाबाद : सिडको एन-५ परिसरातील गीता भवन येथे शकुनीमामा, मरीआई ते थेट नटसम्राटपर्यंतच्या विविध वेशभूषेत ज्येष्ठ अवतरले होते. त्यांनी नुसती वेशभूषाच केली नाही, तर ‘हम अंग्रेजो के जमाने के जेलर है हsssहा’ असे आपल्या स्टाइलमध्ये डायलॉग म्हणत सर्वांना पोट धरून हसविले, तर काहींनी पूरग्रस्तांची मन हेलावून टाकणारी व्यथा ऐकवून सर्वांना चिंतन करण्यास भाग पाडले.
गुरुवार, २ सप्टेंबर रोजी प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेने सभासदांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेची सर्वांमध्ये मोठी उत्सुकता होती. कारण, अनेकांनी शालेय जीवनानंतर आताच वेशभूषा स्पर्धेत भाग घेतला होता. रत्नप्रभा कपूर यांनी शबरी, मीरा पत्की यांनी मरीआई, पद्माकर कुलकर्णी यांनी ज्योतिष, प्रभाकर सुभेदार यांनी राज कपूर ‘मेरा जुता हैं जापानी’ या गाण्यातील वेशभूषा, सुनंदा डबीर यांनी शकुनी मामा, संजय देशमुख यांनी शोलेमधील आसरानीची ‘जेलर’ची भूमिका साकारून सर्वांना पोटधरून हसविले. शैलजा देशपांडे यांनी नटसम्राट, तर श्रीराम जोशी, मंगला जोशी यांनी पूरग्रस्त भागातील व्यथा मांडून सर्वांना चिंतन करण्यास भाग पाडले. डाॅ. कमलाकर वैद्य यांनी ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हे गीत सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.