वाळूज महानगर: रस्त्यावरील खड्ड्यात पडून ७० वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी वाळूज येथे घडली.
येथील शहीद भगतसिंह नगर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. खड्ड्यामुळे अपघाताच्या घटना घडत असल्याने येथून वाहनधारकांना तर काळजी घेवून वाहने चालवावी लागत आहेत.
स्थानिक प्रशासनाकडूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शनिवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या दरम्यान शेवंताबाई पवार ही वृद्ध महिला येथून जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली. या घटनेत ती जखमी झाली आहे.
दरम्यान , या भागातील रहिवाशांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करताच रविवारी सकाळी ग्रामपंचायतीने रस्त्यावरील धोकादायक खड्डा मुरुम टाकून बुजविला आहे.