सिल्लोड : राज्य निवडणूक आयोगाने सिल्लोड नगर परिषदेची निवडणूक घोषित केली असून, २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे ३१ जानेवारीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.सिल्लोड न.प.ची मुदत २ मार्च रोजी संपत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख ४ फेब्रुवारी, नामनिर्देशन पत्र भरण्याची तारीख ५ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दुपारी २ वाजेपर्यंत आहे. सुटीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारता येणार नाही. नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख १३ फेब्रुवारी आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख १८ फेब्रुवारी आहे. चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी १९ फेब्रुवारी रोजी जाहीर होईल. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होऊन २८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे.यंदा नगराध्यक्ष थेट जनतेतूनयंदा नगराध्यक्षाची निवड ही थेट जनतेतून होणार आहे. यामुळे निवडणुकीत रंगत येणार आहे.सभागृहात नगराध्यक्षासह काँग्रेसचे २२ नगरसेवक असून, नगर परिषदेवर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे, तर भाजप ३ व शिवसेनेचा एक नगरसेवक आहे. या निवडणुकीत १३ प्रभाग असून, सभागृहाचे संख्याबळ हे २६ असल्याने संख्याबळात कोणतेही बदल झालेले नाहीत. २६ नगरसेवक व नगराध्यक्ष अशा २७ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
सिल्लोड न.प.ची निवडणूक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:57 PM