कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार प्रशांत बंब, कृष्णा डोणगावकर, अशोक डोणगावकर यांचे निवडणुकीत पंधरा उमेदवार निवडून आले होते. तर, दोन उमेदवार राष्ट्रवादी समर्थक, एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता. त्यानंतर फोडाफोडीचे राजकारण यशस्वी करून संभाजी पाटील डोणगावकर यांना नऊ मतदान झाले होते. तर, शेषराव जाधव यांना नऊ मतदान झाले होते. मात्र, चिठ्ठीवर सभापतीपदी संभाजी पाटील डोणगावकर यांची वर्णी लागली होती. उपसभापती दादा पाटील जगताप यांची निवड झाली. दरम्यान, १३ एप्रिल रोजी विद्यमान सभापती संभाजी पाटील डोणगावकर यांचे कोरोनाने निधन झाले. सभापती पदाची जागा रिक्त झाली.
निवडणूक होणार चुरशीची
जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालयाकडे बाजार समितीकडून पत्रव्यवहार करण्यात आलेला होता. त्यामुळे ४ जूनला नवीन सभापतीची निवड संचालकांमधून बाजार समितीच्या सभागृहात होणार आहे. १७ संचालकांत आ. प्रशांत बंब गट व माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोणगावकर यांच्या गटाचे पाच संचालक आहे. कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या गटाकडे सहा संचालक आहेत, तर शिवसेनेकडे तीन संचालक आहेत. दोन संचालक राष्ट्रवादी पक्षाचे, तर एक अपक्ष आहे. बाजार समितीच्या सभापती विराजमान होण्यासाठी कोणत्याही गटाकडे बहुमत नाही. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.