औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला १६ तास लावले. निवडणूक निर्णय अधिकारी आणि निरीक्षकांमध्ये फेरीनिहाय मतमोजणीचा निकाल देण्यात एकमत होत नसल्यामुळे उशीर होत गेला. राज्यासह मराठवाड्यातील सर्व निकाल जाहीर झालेले असताना औरंगाबाद लोकसभा मतमोजणीचा निकाल मात्र उशिरा लागला. सकाळी ६ वाजेपासून पोलिसांसह सर्व प्रशासकीय यंत्रणा रात्री १२ वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रात ताटकळली होती.
२६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, २७ फेऱ्याअंती निकाल जाहीर करावा लागला. वैजापूर तालुक्यातील एक ईव्हीएममधील मतमोजणीस रात्री ११ वाजविण्यात आले. तोपर्यंत मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी मतमोजणी केंद्र सोडले होते. काही मतमोजणी प्रतिनिधी तेथे होते. टपाली मतदान, ३० मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मतमोजणीला उशीर झाला.
१२ वाजेपर्यंत अंतिम निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देता आला नाही. २७ फेरीतील १ हजार ४८ मतदान वैजापूरमधील एका ईव्हीएमचे होते, असे सांगण्यात आले. मात्र, हे मतदान मोजण्यास उशीर का झाला, याचे स्पष्टीकरण प्रशासनाला देता आले नाही. झालेल्या मतदानानुसार २६ फेऱ्या ठरल्या होत्या. मात्र, २७ मतमोजणी फेऱ्या कशासाठी घेण्यात आल्या, हेदेखील प्रशासनाने सांगितले नाही.