औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक विभागाकडून सोशल मीडियावरही बारीक नजर ठेवली जाणार आहे. सोशल साईटस्वरील पोस्टमध्ये आदर्श आचारसंहितेचा भंग किंवा कुणाचे चारित्र्यहनन होते का हे निवडणूक शाखेकडून तपासले जाणार आहे. तसेच कोणतीही आॅडिओ, व्हिज्युअल जाहिरात सोशल साईटस्वर टाकायची असेल तर आधी निवडणूक विभागाकडून प्रमाणित करून घ्यावी लागणार आहे. राज्यात शुक्रवारपासून विधानसभेची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे प्रचाराच्या काळात कुठे आचारसंहितेचा भंग होतो का यावर आयोगाचे लक्ष असणार आहे. त्यासाठी आचारसंहिता सेल स्थापन करण्यात आला आहे. या निवडणुकीत फेसबुक, व्हॉट्सअॅप, टिष्ट्वटर यासारख्या सोशल साईटस्चा प्रचारादरम्यान उमेदवारांकडून वापर होणार आहे. त्यामुळे निवडणूक विभाग सोशल साईटस्वरही बारीक नजर ठेवणार आहे. उमेदवारांना सोशल साईटस्चा वापर करता येणार असला तरी त्याबाबतही आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले की, सोशल मीडियासंदर्भात सायबर लॉ हा स्वतंत्र कायदा आहेच. त्याअंतर्गत कुठेही कायद्याचा भंग झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. कुणाचे चारित्र्यहनन करणे किंवा कुणाची बदनामी करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे प्रत्येकाने सोशल साईटस्वर पोस्ट टाकताना याची काळजी घ्यावी. याशिवाय उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांना सोशल साईटस्वर आॅडिओ, व्हिज्युअल जाहिराती टाकायच्या असतील तर त्याआधी प्रमाणित करून घ्याव्या लागणार आहेत. निवडणूक शाखेकडून प्रमाणित न करता अशी जाहिरात सोशल साईटस्वर टाकल्यास आचारसंहितेचा भंग समजला जाईल. तसे आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा नोंदविला जाईल.
सोशल मीडियावरही निवडणूक विभागाची नजर
By admin | Published: September 15, 2014 12:39 AM