छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ६३० प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी ५७४ जणांना लोकसभा निवडणुकीच्या कामाची ड्युटी दिली आहे. विशेष म्हणजे त्यात विद्यापीठातील चार मृत कर्मचारी आणि धाराशिव येथील उपकेंद्रातील ११ जणांना निवडणुकीच्या शहरातील प्रशिक्षणाला ३ ते ५ एप्रिलदरम्यान हजर राहण्याचे आदेश मिळाले आहेत. त्याशिवाय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याशिवाय प्र-कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा संचालक, अधिष्ठातांनाही ड्युटी दिली. त्याचा फटका विद्यापीठाच्या वार्षिक परीक्षांना बसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
औरंगाबाद लोकसभा निवडणूक विभागाकडून विद्यापीठातील ६० कर्मचाऱ्यांची सेवा मागील दोन महिन्यांपूर्वीच अधिग्रहित केली आहे. त्याच वेळी विद्यापीठ व उपकेंद्रात कार्यरत १७० पेक्षा अधिक प्राध्यापकांसह अधिकारी व कर्मचारी अशा ५७४ जणांना निवडणुकीच्या प्रशिक्षणाला हजर राहण्याचे आदेश मागील २५ मार्चपासून मिळाले आहेत. त्यामध्ये चक्क चार मृत कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षणाला हजर राहण्याचे आदेश दिले गेले. धाराशिव येथील विद्यापीठाच्या उपकेंद्रात कार्यरत ११ कर्मचाऱ्यांना औरंगाबाद लोकसभेचे काम दिले आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे पद असलेले प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, चार जिल्ह्यांतील २ लाख ४७ हजार ७०९ विद्यार्थ्यांच्या परीक्षेची जबाबदारी असलेल्या संचालक डॉ. भारती गवळी, प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह महत्त्वाची पदे असलेल्या अधिष्ठातांनाही निवडणुकीची ड्युटी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन हवालदिल झाले आहे. ऐन परीक्षेच्या कालावधीतच निवडणुकीसाठी विद्यापीठांसह संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या सेवा अधिग्रहित झाल्यामुळे त्याचा फटका परीक्षेचा निकाल लावण्यास बसण्याची शक्यता आहे.
कुलगुरूंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्रविद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी प्रकुलगुरूंसह महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना निवडणुकीची जबाबदारी देण्यात येऊ नये, अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांना पाठविल्याचेही सूत्रांनी सांगितले.
एक पेपर पुढे ढकललाविद्यापीठाच्या परीक्षा विभागाने निवडणुकीच्या प्रशिक्षणामुळे ६ एप्रिल रोजी होणारा परीक्षेचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. हा पेपर संपूर्ण परीक्षा संपल्याच्या दुसऱ्या दिवशी घेण्यात येणार असल्याचेही परीक्षा विभागाने स्पष्ट केले.