छत्रपती संभाजीनगर : लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांची शिवसेना (ठाकरे गट) नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. दानवे यांच्यामुळे मराठवाड्याला शिवसेनेचे दुसरे नेतेपद मिळाले. दानवे यांची नेतेपदी नियुक्ती करून ‘मातोश्री’ने दानवे यांना खैरे यांच्या बरोबरीचे स्थान दिले आहे.
उद्धवसेनेच्या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख असलेल्या आ. अंबादास दानवे यांनी औरंगाबाद लोकसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने खैरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकल्याने आ. दानवे नाराज होते. तेव्हा दानवे यांनी खैरे यांचा प्रचार करणार नाही, मी पक्षाचा प्रचार करीन, असे स्पष्टपणे सांगितले होते. यानंतर पक्षप्रमुखांना आ. दानवे यांची समजूत काढण्यात यश आले.
पक्षप्रमुखांच्या निर्देशानुसार आ. दानवे यांनी खैरे यांच्यासोबत दिलजमाई केली आणि त्यांना पेढाही भरविला होता. यानंतर शहर आणि ग्रामीणमधील दानवे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या विविध पदांवर नेमणुका करण्यात आल्या होत्या. शनिवारी तर पक्षातील नेतेपदी आ. दानवे यांची नियुक्ती करून पक्षाने त्यांच्यावरील विश्वास व्यक्त केला. दानवे यांच्यामुळे मराठवाड्याला दुसरे नेतेपद मिळाले आहे. दानवे यांना नेतेपद देऊन चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर टाकली आहे.