छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत मोठा गाजावाजा करीत राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज भरले. आरोप-प्रत्यारोपाची आतषबाजी एकीकडे बघायला मिळत आहे, तर दुसरीकडे दिवाळीच्या खरेदीचा ‘फिव्हर’ चढला आहे.
‘वसुबारस’ने आजपासून दिवाळीच्या धामधुमीला सुरुवात झाली. घरोघरी गाई व वासराच्या मूर्ती, प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच घरासमोर आलेल्या गाई व वासरालाही नैवेद्य दाखविण्यात आला. अनेक महिला संघटनांनी थेट गोशाळेत जाऊन गायीला चारा खाऊ घातला. दुसरीकडे बाजारपेठेत नवीन वस्तू खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसून आले.
या खरेदी उत्सवात घरातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी रेडिमेड कपडे खरेदी केले जात होते. शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत गर्दी होतेय, शिवाय हडको, टीव्ही सेंटर चौकात गर्दी उसळलेली पाहण्यास मिळाली. गजानन मंदिर चौक ते पुंडलिकनगरपर्यंत खरेदीचा तोच उत्साह होता. त्रिमूर्ती चौकात तर सतत वाहतूक ठप्प होत होती. एवढी गर्दी सायंकाळनंतर बघण्यास मिळाली. जालना रोडवर दागिन्यांच्या मोठ्या शोरूममध्येही आज खरेदीची धूम होती.
पणत्या, उटणे, अगरबत्तीआज बाजारात पणत्या, उटणे, अगरबत्ती, सारीच्या लाह्या-बत्ताशे, बोळके, केरसुणी, तसेच लक्ष्मीच्या मूर्ती, डिजिटल फोटोतही मोठी उलाढाल झाली. औरंगपुरा, गुलमंडी, सुपारी हनुमान रोड, मछली खडक, कुंभारवाडा या भागांत ग्रामीण भागातून आलेले अनेक विक्रेते बस्तान मांडून बसले आहेत. त्यांच्याकडूनही ग्राहक आवर्जून खरेदी करीत होते.
पहिल्या दिवसापासून आतषबाजीसोमवारी ‘वसुबारस’ सण साजरा करण्यात आला. दिवाळीच्या पहिल्याच दिवसापासून फटाका बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ दिसून आली. आज दिवसभरात १० लाखांपेक्षा अधिकचे फटाके विक्री झाल्याची माहिती महाराष्ट्र फटाका असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ कुलकर्णी यांनी दिली. शहरातील अनेक भागांत दुपारी व सायंकाळनंतर फटाक्यांची आतषबाजी सुरू होती.