पैठण : तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचांची निवड शुक्रवारी (दि. १२) होणार आहे. एकाच दिवशी इतक्या गावकारभाऱ्यांच्या निवडीची ही पहिलीच वेळ असून प्रशासनाने सुद्धा जय्यत तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे आरटीपीसीआर टेस्टसाठी सहलीवर गेलेल्या सदस्यांना परत फिरावे लागणार असल्याने यादरम्यान दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इच्छुकांची धाकधुक वाढली असल्याचे चित्र आहे.
पैठण तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान झाले होते. त्यानंतर सरपंच आरक्षणाचा पेच न्यायालयात गेल्याने निकालानंतर नुकतेच रखडलेले आरक्षण काढण्यात आले. निवडणूक झालेल्या तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींची मुदत १५ फेब्रुवारी २०२१ रोजी संपत आहे. त्यामुळे मुदतीत सरपंचाची निवड करणे बंधनकारक असल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पैठणसंबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंचांच्या निवडीचे आदेश तहसील प्रशासनास दिले आहेत.
सरपंच, उपसरपंच निवडीसाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायतीची पहिली ग्रामसभा शुक्रवारी (दि. १२) होणार असून यासाठी ८० अध्यासी अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. ६ अध्यासी अधिकारी राखीव ठेवण्यात आले आहेत.
-------
सहलीवर गेलेल्यांना परत फिरावे लागणार
सरपंच, उपसरपंच निवडीसाठी आयोजित पहिल्या ग्रामपंचायतीच्या सभेसाठी सर्व ग्रामपंचायत सदस्यांना आरटीपीसीआर (कोविड १९) चाचणी करणे बंधनकारक आहे. यासाठी सहलीवर गेलेल्या सदस्यांना परत फिरावे लागणार आहे. आरटीपीसीआर चाचणी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र मिळत असल्याने धाकधुक वाढली आहे.