फुलंब्री : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे थंडीच्या दिवसात गरम वारे जोरात वाहत असून पॅनल तयार करण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. यात अनेकांचे रुसवेफुगवे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पॅनल प्रमुखांची दमछाक होऊ लागली आहे.
तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतपैकी ५३ ग्रामपंचायतच्या निवडणुका येत्या १५ तारखेला होऊ घातलेल्या आहे. त्याकरिता निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. २३ ते ३० डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. ३१ डिसेंबर रोजी छाननी केली जाणार आहे. तर उमेदवारी अर्ज परत घेण्याची तारीख ४ जानेवारी आहे. त्यामुळे अवघ्या नऊ दिवसाचा कालावधी हा प्रचाराचा राहणार आहे.
तालुक्यातील मोठ्या गावावर नजर
गणोरी, वडोदबाजार, बाबरा, निधोना, पाल टाकळी, कोलते, किनगाव, वारेगाव, वाणेगाव, जातेगाव, कान्होरी, पिंपळगाव वळण, मारसावळी या महत्वाच्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका महत्त्वाच्या व लक्षवेधी ठरणार आहे. कारण या ग्रामपंचायतीवर बड्या राजकीय लोकांचे देखील लक्ष असणार आहे.