औरंगाबाद : एमआयएमच्या हैदराबाद येथील पक्ष कार्यालयात आज सकाळी अकरा वाजता औरंगाबाद लोकसभा संदर्भात सविस्तर बैठक घेण्यात आली. या बैठकीत पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद शहरातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. सर्वांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवावी असे मत मांडले. उमेदवार म्हणून आमदार जलील योग्य असल्याचे नमूद केले.
आज सकाळी ११ वाजता हैदराबाद येथील एमआयएमच्या दार-उस्स- सलाम या पक्ष कार्यालयात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस एमआयएमचे सर्व २३ नगरसेवक, पक्षनेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने खा. असदोद्दीन ओवेसी प्रचारात व्यस्त आहेत. हैदराबाद येथे त्यांनी स्वत:ला झोकून देऊन काम सुरू केले आहे. त्यातच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पक्षाने निवडणूक लढवावी, असा स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.
रात्री होणार अंतिम निर्णय जिल्ह्यातील मुस्लिम, दलित मतांची संख्याही काढण्यात आली आहे. लोकसभेला ५२ ते ५५ टक्के मतदान होते. मतदानाची ही टक्केवारी गृहीत धरून उमेदवार निवडून येऊ शकतो का? याचेही गणित एमआयएम कार्यकर्ते यांनी पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या समोर आज झालेल्या सभेत मांडले. खासदार ओवेसी यांनी औरंगाबाद शहरातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. सर्वांनी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवावी असे मत मांडले. उमेदवार म्हणून आमदार जलील योग्य असल्याचे नमूद केले. रात्री आठ वाजता पुन्हा एकदा बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.
एमआयएमच्या निर्णयाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्षऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास तिरंगी लढत पाहायला मिळेल. एमआयएम पक्षप्रमुखांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यास या मतदारसंघात पारंपरिक सेना विरुद्ध काँग्रेस, अशी लढत पाहायला मिळेल. मुस्लिम, दलित मतांचे विभाजन झाल्यास याचा थेट फायदा युतीच्या उमेदवाराला होईल, असेही जाणकारांचे मत आहे. प्रत्येक निवडणुकीत सेनेला मत विभाजनाचा चांगलाच फायदा झालेला आहे. यंदाही त्रिकोणी लढत होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.