औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकांसाठी प्राथमिक मतदार यादीनंतर दुरुस्तीसह मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीसंदर्भात कुलगुरुंकडे अपील करण्यासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.
विद्यापीठातील विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकांसाठी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार यादीची प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी रात्री २ वाजेपर्यंत कुलसचिव डॉ. भगवान साखळे रुजू होताच आठवड्याभरात त्रुटीपूर्तता प्रक्रिया पूर्ण झाली. त्यांच्यासह उपकुलसचिव विष्णू कऱ्हाळे, अर्जुन खांड्रे, संजय लांब यांच्यासह निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्री २ वाजेपर्यंत उपस्थित राहून यादी प्रसिद्ध केली. प्राचार्य १०१, संस्थाचालक २००, विद्यापीठ शिक्षक १४१, महाविद्यालयीन शिक्षक २६९८, पदवीधर ४४,२३१, अभ्यास मंडळ १५४९ या प्रमाणे मतदारांची संख्या आहे.
अधिसभेची प्राथमिक मतदार यादी २६ सप्टेंबर रोजी प्रकाशित करण्यात आली. ३० सप्टेंबरपर्यंत यादीसंदर्भात आक्षेप मागविण्यात आले. एकूण १०७६ आक्षेप पडताळणी, छाननी करून सोमवारी रात्री यादी घोषित करण्यात आली. दुरुस्त मतदार याद्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदार यादीतील नोंदीसंदर्भात अपील कुलगुरुंकडे करण्यासाठी लेखी स्वरूपात दिलेल्या नमुन्यात व सबळ पुराव्यासह कार्यालयीन वेळेत निवडणूक विभागात २२ ऑक्टोबर सायं. ५ वाजेपर्यंत अपील सादर करावेत. त्या दिवशी चौथा शनिवार असला तरी निवडणूक विभागाचे कार्यालय सुरू राहील. अपील नमुना संकेतस्थळावरील निवडणूक पोर्टलवर उपलब्ध आहेत. या संदर्भात कुठल्याही वैयक्तिक पत्रव्यवहार केला जाणार नाही, असे कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी सांगितले.