तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील विजयनगर भागात अंतर्गत विजेचा खांब मुळासकट तुटून दोन महिने झाले आहेत. त्यावरुन गावाचा वीजपुरवठा चालू आहे. खांब दोरीने बांधून ठेवला असून, या धोकादायक विजेच्या खांबामुळे येथील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.२६ फेब्रुवारी रोजी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. वाऱ्याने विजयनगर भागातील सिमेंट खांब मुळासकट मोडून विजेच्या तारावर उभा आहे. भर रस्त्यावर मोडलेला विजेचा खांब रहिवाशांनी दोर बांधून धरून ठेवला आहे. वादळी वाऱ्याने हा खांब घरावर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून, यात वीजपुरवठा चालू असल्याने जीवित हानीचीही शक्यता नाकारता येत नाही. याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना खांबाची माहिती देऊनही तो खांब बदलला जात नाही. १६ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. या धोकादायक खांबाजवळून विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करावे लागणार आहे. धोकादायक विजेच्या खांबामुळे येथील रहिवाशांचे जीवन धोकादायक बनले आहे. कधी खांब कुणावर कोसळेल याचा नेम नाही. तरी धोकादायक विजेचा खांब बदलून वीजपुरवठा चालू करावा, अशी मागणी विजय प्रताप युवा मंचचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी केली आहे. अन्यथा येथील रहिवासी महावितरणच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
विजेच्या खांबाला दोरीचा आधार..!
By admin | Published: June 10, 2014 12:10 AM